वाळूज महानगर : भरधाव पिकअपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शिंधी-सिरसगाव फाट्यावर घडली. निलेश भाऊसाहेब बोडखे (२२, रा. रांजणगाव पोळ) असे मृताचे नाव असून, साईनाथ कडु शेलार (२२, रा. वसू सायगाव) हा गंभीर जखमी झाला आहे.
निलेश बोडखे व त्याचा मित्र साईनाथ शेलार हे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत कंत्राटी कामगार आहेत. गुरुवारी कंपनीत दुसरी शिफट असल्याने निलेश व साईनाथ हे रांजणगाव पोळ येथून दुपारी दुचाकीने (एमएच- २०, डीएल- ९५०१) कामाला निघाले. शिंधी-सिरजगाव फाटा येथे एएस क्लब कडून लासूरकडे भरधाव पिकअप व्हॅनने (एमएच- २०, ईजी- ०६६२) दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली.
यात निलेश बोडखे जागीच ठार झाला, तर साईनाथ शेलार गंभीर जखमी झाला. दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
मृत निलेश बोडखे याचे वडील भाऊसाहेब बोडखे हे रांजणगाव पोळ गावचे माजी उपसरपंच असल्याने शासकीय रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु नोंद करण्यात आली आहे.