वाळूज महानगर : विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार ठार झाला, तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वाळूज एमआयडीसीतील स्टरलाईट कंपनीसमोर शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. यात रामेश्वर मधुकर सहाणे (३२) असे मृताचे नाव आहे. तर जखमीमध्ये शंकर भगवान घायवट (२१) याचा समावेश आहे.
रामेश्वर सहाणे (३२ रा. बरंजळा साबळे ता.भोकदरन जि.जालना) हा आठवठ्यापूर्वीच कामासाठी वाळूज एमआयडीसीत आला होता. येथे रोजगार मिळाल्याने रामेश्वर व मित्र शंकर भगवान घायवट (२१) हे रांजणगाव शेणपुंजी येथे रहात होते. कंपनीत जाण्यासाठी ते मित्र सचिन डांगे याची दुचाकी (एम.एच.२०, ईएम.८२९७) वापरत होते. रामेश्वर शंकरसह शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने कपडे इस्त्री करण्यासाठी गेला.
दरम्यान, स्टरलाईट कंपनीसमोर आल्यानंतर विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून रामेश्वर सहाणे याला मृत घोषित केले. या प्रकरणी शंकर घायवड याच्या तक्रारीवरुन ट्रकचालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.