औरंगाबाद : सिडको बसस्थानकासमोरील सिग्नलवर एका बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना १२ वाजेच्या दरम्यान घडली. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १२ वाजेच्या दरम्यान बसस्थानकाजवळील चौकात सिग्नल लागल्याने बाहतूक थांबली होती. यावेळी परळी येथील शुभम शिंदे हा एकासोबत आपल्या दुचाकीवर ( एमएच ४४ व्ही ४४१२ ) एका बसच्यामागे सिग्नलला उभा होता. दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या औरंगाबाद- जालना ( एमएच २० बीएल २९०९ ) विनावाहक बसने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. दुचाकीवरील दोघेही बसच्या खाली आले. यात शुभम गंभीर जखमी झाला असून दुसरा तरुण जागीच ठार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच एसीपी दीपक गिर्हे, पीआय विठ्ठल पोटे, पोउनि एम. पी. लाड, पोउनि कैलास अन्नलदात आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी घाटी रुग्णालयात रवाना केले. यानंतर रस्त्याची एकबाजू बंद करून ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.
नागरिकांकडून बसची तोडफोडसिडको बसस्थानकाच्या समोरील सिग्नलजवळ नेहमीच बसमुळे भीषण अपघाताच्या घटना घडत आहेत. आजही असाच प्रसंग घडून तरुणाचा अंत झाल्याने संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड केली. दरम्यान, जखमी शुभम शिंदे आणि बसमधील चार ते पाच जखमी प्रवासी यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.