वाळूज महानगर : रांजणगावातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश पांडुरंग नागवे (रा. चिकलठाण) यांनी ७ मार्चला रांजणगावातील कमळापूररोडवर दुचाकी (क्र. एमएच २०, एफआर ८७२८) उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.
---------
यश फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
वाळूज महानगर : साउथसिटीतील यश फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी जीपीएटी या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत पवन बिगरड, भगवान झोटे, राजेंद्र खरात, ऋषिकेश लिंगायत, अयोध्या तोतरे, पूजा करपे, सतीश कुरधणे, कैलास सोनपसारे, प्रा. रेखा गजरे या नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. या यशाबद्दल प्राचार्य व संस्थेच्या अध्यक्षांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
-------------------------
प्रेस मशीनवर महिला कामगाराचा अपघात
वाळूज महानगर : प्रेस मशीनवर काम करताना ३५ वर्षीय महिला कामगाराची दोन बोटे तुटल्याची घटना वाळूज एमआयडीसीतील प्रेस कंपनीत घडली. सरिता राजू ढेंबरे (३५, रा. बजाजनगर) या १८ मार्चला प्रेस मशीनवर काम करीत असताना मशीनमध्ये हात अडकून त्यांचा अंगठा व एक बोट तुटले. यानंतर जखमी सरिता ढेंबरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जखमी महिलेच्या तक्रारीवरून व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------------
पर्यायी रस्त्याअभावी वाहनधारकांची गैरसोय
वाळूज महानगर : रांजणगाव ते फाटा या रस्त्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी रस्ता नसल्यामुळे गावातून तसेच बाहेरहून गावात येणाऱ्या वाहनधारकांना मोठा वळसा टाकून ये-जा करावी लागत आहे. गत पंधरा दिवसांपासून या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना नागरी वसाहतीतील अरुंद रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. रस्त्याचे काम करण्यापूर्वी पर्यायी रस्त्याची व्यवस्था न करण्यात आल्याने वाहनधारकांना ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
------------------------
वाळूजला भाजीपाल्याचे भाव गडगडले
वाळूज महानगर : वाळूजला सोमवारी आठवडी बाजारात भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने ग्राहकांनी स्वस्तात भाजीपाला खरेदी केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शनिवार व रविवार पूर्ण लॉकडाऊन केल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करता आला नव्हता. सोमवारच्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणला होता. मात्र ग्राहक नसल्याने शेतकऱ्यांनी स्वस्तात भाजीपाला विक्री केला.