: वाळूज पोलीस ठाण्यासमोर घडला अपघात
वाळूज महानगर : ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार कामगार ठार झाल्याची घटना रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वाळूज पोलीस ठाण्यासमोर घडली. या अपघातात हरिभाऊ लक्ष्मण पंडित (५०, रा. समता कॉलनी, वाळूज) हे गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
हरिभाऊ पंडित हे गरवारे या कंपनीचे कामगार आहेत. रविवारी सायंकाळी कंपनीतून सुटी झाल्यानंतर हरिभाऊ पंडित हे दुचाकी (एम.एच.१७, ए.क्यू.८६२)वरून घराकडे जाण्यासाठी निघाले आहे. औरंगाबाद-नगर महामार्गावरून घरी जात असताना रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वाळूज पोलीस ठाण्यासमोर हरिभाऊ पंडित यांच्या दुचाकीला ट्रक (एम.एच.२०,ए.टी.६०६३)चा धक्का बसून ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडले. यात हरिभाऊ पंडित यांच्या अंगावर ट्रकचे चाक गेल्याने चेंदामेंदा होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलीस ठाण्यासमोर अपघात झाल्याचे दिसताच सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक सचिन मिरधे, सहायक फौजदार शेख सलीम, पो.कॉ. किशोर साबळे आदींनी घटनास्थळ गाठून मदत केली. यानंतर मयत कामगार हरिभाऊ पंडित यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. या अपघातानंतर पोलीस ठाण्यासमोर जमाव जमला होता; मात्र पोलिसांनी जमावाची समजूत काढत ट्रकचालकास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या अपघातामुळे औरंगाबाद-नगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी व ट्रक घटनास्थळावरून हटवून वाहतूक सुरळीत केली. या अपघात प्रकरणी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले.
फोटो ओळ- वाळूज पोलीस ठाण्यासमोर दुचाकी व ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वार कामगार ठार झाला. अपघातग्रस्त दुचाकी व ट्रक.
फोटो क्रमांक- हरिभाऊ पंडित (मृत)
--------------------------------