वाळूज महानगर : फायनान्स कंपनीतील अधिकाऱ्याची ७५ हजार रुपये असलेली बॅग पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी वाळूज एमआयडीसीत घडली.
याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विनोद भुजंगराव येवले (२९) हे शहरातील भारत फायनान्समध्ये फिल्ड आॅफीसर म्हणून काम करतात. कंपनीकडून जोगेश्वरी व रांजणगावातील महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी कर्ज वाटप करण्यात आले. या शिवाय नवीन बचत गटांनाही कर्ज पुरवठा केला जातो.
या बचत गटांना वाटप केलेल्या कर्जाचा हप्ता वसूल करण्यासाठी विनोद येवले हे प्रत्येक शुक्रवारी वाळूज एमआयडीसीत येतात. ते शुक्रवारी दुचाकीने (एम.एच.२१-ए.जे.८३५९) जोगेश्वरीत आले होते. गावातील बचत गटाकडून त्यांनी कर्जाच्या हप्त्याचे ७५ हजार ७३८ रुपये जमा केले. याच बरोबर नवीन कर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या बचत गटातील महिलाचे आधारकार्ड, मतदान कार्ड व कागदपत्रे जमा करुन बॅगेत ठेवले.
यानंतर ही बॅग दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर ठेवून ते दुपारी १.३० वाजेच्या सुमारास शहराकडे निघाले. दरम्यान, वाळूज एमआयडीसीतील लक्ष्मी हॉटेलजवळ दुपारी २ वाजेच्या सुमारास पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या तिघांपैकी पाठीमागे बसलेल्याने बॅग हिसकावून घेत भरधाव निघून गेले. ही लक्षात येताच विनोद येवले यांनी आरडा-ओरडा करीत त्यांचा पाठलाग केला. मात्र, त्यांच्या दुचाकीचा वेग जास्त असल्याने ते क्षणार्धात गायब झाले.
पाळत ठेवून कृत्यचोरट्यांनी पाळत ठेवून ही बॅग लांबविल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. बॅगमध्ये ७५ हजार ७३८ रुपये रोख, लॅपटॉप व बायोमॅट्रिक मशिनचा समावेश असल्याचे येवले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.