औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भिंतींवर गेल्या २ वर्षांपासून मुदतबाह्य अग्निरोधक यंत्रे लटकत होती. हा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणताच अवघ्या १० दिवसांत मुदतबाह्य यंत्रे हटवून नवी यंत्रे बसविण्यात आली.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून नवजात शिशूंचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रांच्या अवस्थेची पाहणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. रुग्णालयाच्या भिंतींवर दोन वर्षांपासून मुदतबाह्य अग्निरोधक यंत्रे होती. हा प्रकार ‘लोकमत’ने १३ जानेवारी रोजी ‘जिल्हा रुग्णालयात मुदत संपलेली अग्निरोधक यंत्रे’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समाेर आणला. जिल्हा रुग्णालयात ७९ अग्निरोधक यंत्रे होती. वृत्त प्रकाशित होताच ही सर्व यंत्रे बदलण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. याठिकाणी नवी यंत्रे बसविण्यात आल्याने काही दुर्घटना घडल्यास त्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी मदत होणार आहे.
रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रे बदलण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
फोटो ओळ...
जिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेली नवी अग्निरोधक यंत्रे.