पोलिस अधिकाऱ्याच्या ''अशा'' कृत्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही आमच्या कर्तव्यात अपयशी ठरु _ खंडपीेठाचे निरीक्षण
औरंगाबाद : महाविद्यालयीन तरुणी आकेफा मेहरीन हिच्या अपघाती मृत्यूची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेल्यानंतर अखेर दोन वर्षांनंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटेवर यांच्यावर 'निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत' ठरल्याचा गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या गुन्ह्याचे तपासी अंमलदार साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. खटाणे यांची तत्काळ विभागीय चौकशी करून सक्त कारवाई करण्याचे आदेश न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. २२ एप्रिल २०१९ रोजी पाटेवर यांच्या खासगी कारने टाऊन हॉल उड्डाणपुलावर आकेफाच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली होती. उपचारादरम्यान २४ एप्रिल २०१९ रोजी ती मरण पावली होती. याबाबत आकेफाचे वडील मोहम्मद जहीर यांनी ॲड. सईद एस. शेख यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. ११ डिसेंबर २०२० रोजी न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. शेवलीकर यांनी पोलीस आयुक्तांना या प्रकरणात स्वत: लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ५ जानेवारी २०२१ रोजी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी चौकशी अहवाल सादर करून खटाणे यांनी तपासात गंभीर चुका केल्याचे मान्य केले. त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचे तसेच खटाणे यांच्याकडून तपास काढून साहाय्यक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर यांच्याकडे सोपविल्याचे म्हटले होते. आरोपी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करून कनिष्ठ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपासी अधिकाऱ्याची वेतनवाढ रोखण्याची कारवाई सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. सईद एस. शेख यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. सय्यद जाहीद अली यांनी सहकार्य केले; तर शासनाच्या वतीने सरकारी वकील डी. आर. काळे आणि साहाय्यक सरकारी वकील के. एस. पाटील यांनी काम पाहिले.