छत्रपती संभाजीनगर : दोन युवकांनी दुकानात शिरुन लुटण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. पहिल्या गोळीचा नेम चुकल्यामुळे दुकानचालक बालंबाल बचावला. एक राऊंड फायर झाल्यानंतर पिस्तुलची स्प्रिंग तुटल्यामुळे दुसरी गोळी झाडता आली नाही. घटनास्थळीच स्प्रिंगसह तीन जिवंत काडतुसे पडली. ही घटना सिडको एन-२ परिसरातील ठाकरेनगरमध्ये जयभवानी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे शुभम फायनान्स ॲण्ड मल्टिसर्व्हिसेस दुकानात शुक्रवारी रात्री ८.४८ वाजता घडली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.जयभवानी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रस्त्यावर विलास राठोड यांचे शुभम फायनान्स ॲण्ड मल्टिसर्व्हिसेस हे दुकान आहे. या दुकानात शुक्रवारी रात्री ८.४८ वाजता दोन युवक पेट्रोल पंपाकडून चालत आले. त्यातील एकाने दुकानात प्रवेश केला. पिस्तुल काढुन थेट विलास राठोड यांच्या दिशेने गोळी मारली. ती गोळी प्रिंटरवर लागली. एकाएकी घडलेल्या घटनेमुळे विलास घाबरून गेले. लुटारूने गल्ल्यातील दोनशे रुपये काढुन घेतले. त्यानंतर आणखी पैसे काढ असे ओरडत असतानाच पिस्टलमधून दुसरी राऊंड फायर करण्याच्या तयारीत असतानाच पिस्तुलची स्प्रिंग तुटली. त्यामुळे स्प्रिंगसह आतमधील तीन जिवंत काडतुसे दुकानासमोरच पडले. याचवेळी दुसऱ्या साथीदाराने दुकानाच्या समोरच्या एका गाडीच्या काचा दगडाने फोडल्या. त्यानंतर युवक ठाकरेनगरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
लुटारू गेल्यानंतर विलास राठोड यांनी ११२ नंबरवर फोन करून गोळीबारची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांची गाडी दाखल झाली. त्यानंतर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, मुकुंदवाडी निरीक्षक विठ्ठल ससे, जवाहरनगरचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक काशिनाथ महांडुळे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, प्रविण वाघ, अजित दगडखैर, गजानन सोनटक्के यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या प्रकरणी विलास राठोड यांच्या तक्रारीवरुन रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला.
लुटारू सीसीटीव्हीत कैद
गोळीबार करणारे दोन लुटारू शेजारच्या दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेने पाच पथके स्थापन केली आहेत. या पथकांकडून लुटारू ज्या भागातुन आले आणि गेले त्याठिकाणच्या सर्व रस्त्यावरचे सीसीटीव्ही फुटेज रात्री उशिरापर्यंत तपासण्यात येत होते.