छत्रपती संभाजीनगर : खेळाविषयी पॅशन, देशावरील प्रेम, कामगिरीत प्रचंड सातत्य, संयम, दडपणातही मोठी खेळी बांधण्याचे फलंदाजीचे कौशल्य यामुळे सचिन तेंडुलकरच आपला आदर्श आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत कामगिरी बजवायची आहे. हे उद्गार आहेत मराठवाड्याचा शैलीदार फलंदाज सचिन धस याचे. बीसीसीआयची चॅलेंजर ट्रॉफी आणि चौरंगी वनडे मालिकेत केलेल्या भरीव कामगिरीमुळे संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱ्या आशिया चषकासाठी सचिन धसची भारतीय संघात निवड झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे आल्यानंतर बीडच्या सचिन धस याने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘क्रिकेटचे बाळकडू आपल्याला घरातूनच मिळाले. वडील संजय धस हे स्वत:च क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे वयाच्या चौथ्या वर्षापासूनच क्रिकेटचे धडे गिरवायला लागलो. मॅटवरच सराव करून महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील संघात लागलो. मात्र, टर्फचे महत्त्व असल्यामुळे वडिलांनी टर्फविकेट तयार करून दिली. विनू मंकड, चॅलेंजर ट्रॉफी आणि चौरंगी वनडे मालिकेत सातत्यपूर्वक कामगिरीमुळे भारतीय संघात निवड झाली.
आता संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱ्या आशिया चषकात स्वाभाविक फलंदाजी करून भारताला जिंकून देण्याचे माझे प्रमुख लक्ष्य आहे. त्यानंतर वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे आपले टार्गेट आहे. माझे मुख्य स्वप्न हे सीनिअर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे आहे. प्रचंड स्पर्धेची मला जाण आहे. मात्र, यासाठी मी कठोर मेहनत घेऊन आणखी मानसिकता कणखर करण्याचा, संयम आणि एकाग्रता वाढवण्याचा माझा प्रयत्न असेल.’
स्वभाव शांत, मात्र फलंदाजी स्फोटकसचिन धसने बीसीसीआयच्या १४ वर्षांखालील स्पर्धेत मुंबईविरुद्ध आठव्या क्रमांकावर येऊन ३६ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याला निवड समितीने वरच्या फळीत खेळण्याची संधी दिली. या संधीचे सोने करीत सचिनने गुजरात आणि सौराष्ट्रविरुद्ध अर्धशतके ठोकली. बीसीसीआयच्या १६ वर्षांखालील स्पर्धांत त्याने गुजरातविरुद्ध ११६ धावांची खेळी केल्यानंतर कधी मागे वळून पाहिले नाही. त्याचा स्वभाव शांत आहे. मात्र, तो फलंदाजी स्फोटक करतो, असे प्रशिक्षक अझहर शेख यांनी सांगितले.
.. म्हणून मुलाचे नाव सचिन ठेवलेसुरुवातीपासून क्रिकेट खेळात रस होता. सचिन तेंडुलकरची फलंदाजी आपल्याला आवडत होती. त्यामुळे मुलाचे नाव सचिन ठेवले. सचिनने धावांचे इमले रचून सीनिअर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करावे.- संजय धस ( सचिनचे वडील)