छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यापासून उद्धवसेनेला लागलेली गळती थांबायला तयार नाही. १५ दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शुक्रवारी उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसला. उद्धवसेनेच्या १० माजी नगरसेवकांनी शुक्रवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.
यात स्थायी समितीचे माजी सभापती मोहन मेघावाले, माजी सभागृह नेता किशोर नागरे, गटनेता मकरंद कुलकर्णी, माजी नगरसेवक अनिल जयस्वाल, रूपचंद वाघमारे, माजी नगरसेविका स्वाती नागरे, ज्योती वाघमारे, मीना गायके, ज्योती पिंजरकर, सीमा खरात यांचा समावेश आहे. या माजी नगरसेवकांचा १५ दिवसांपूर्वीच प्रवेश होणार होता. मात्र शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तो लांबला होता.
उद्धवसेनेचे पदाधिकारी आणि माजी महापौर, नगरसेवक काही दिवसांपासून सतत पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी पक्षाची उमेदवारी नाकारली आणि काही दिवसांनंतर शिंदेसेनेत प्रवेश केला होता. नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि त्यांच्या पत्नी अनिता घोडेले, तसेच मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी शिंदेेसेनेत प्रवेश केला. यानंतर आणखी दहा ते बारा माजी नगरसेवक आणि पदाधिकारी पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडू नये, यासाठी शिवसेना नेते अंबादास दानवे आणि खैरे यांनी त्यांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. एवढेच नव्हे तर दोन्ही नेत्यांनी एकत्र येत पक्षाचा मेळावा घेतला. मात्र यानंतरही गळती थांबलेली नाही.
१५ दिवसांपूर्वी पूर्व विधानसभा शहर संघटक विश्वनाथ स्वामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता आणखी १० माजी नगरसेवकांनी मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मुक्ताई बंगल्यात शिंदेसेनेमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संदीपान भुमरे आणि आ. प्रदीप जैस्वाल, युवा सेनेचे ऋषिकेश जैस्वाल यांची यावेळी उपस्थिती होती.