विहामांडवा (जि. औरंगाबाद): ‘तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो’ या सूत्रानुसार आम्ही २५ वर्षे भाजपला जपले, जोपासले. त्यांना प्रत्येक वेळी मदत केली. पण हे आता आमच्याच घरात घुसायला निघालेत. आता सोडणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवसेना एकटी लढल्यानंतर नुकसान होणार, एवढेच खासदार, आमदार निवडून येणार अशी गणिते मांडली जात आहेत. नुकसान कोणाचे होणार हे कळेलच. शेतकºयांना न्याय देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली होती. जनतेला २०२२ पर्यंत हे देऊ, ते देऊ असे सांगत आहे. पण तुम्ही तोपर्यंत राहणार आहात का? कारण जनताच तुमचा निकाल लावणार आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.डल्ला मारणारे करताहेत हल्लाबोल-सध्या काहीजण रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना सत्तेत असून विरोधाची भूमिका घेत असल्याची टीका करतात; पण स्वत:साठी कधीतरी टीका केली का? जनतेच्या हितासाठीच सरकारवर टीका करत आहोत. दिल्ली ते गल्लीपर्यंत डल्ला करणारेच हल्लाबोल करत आहेत, अशी टीका ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. मात्र भाषणात सतत अडथळा येत होता.हे तरअधर्मी सरकार : केवळ जाहिरातबाजी करणाºया केंद्र आणि राज्य सरकारवरचा शेतकरी व सर्वसामान्यांचा विश्वास उडाला असून, धर्माला आत्महत्या करायला लावणारे हे अधर्मी सरकार असल्याची टीका, उद्धव ठाकरे यांनी जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे केली.
‘घरात घुसलात तर सोडणार नाही’, उद्धव ठाकरे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 12:06 PM