औरंगाबाद : भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse- Patil) तत्परतेने कारवाई करत नाहीत किंबहुना भाजपविरोधात (BJP) वळसे पाटील आक्रमक भूमिका घेत नाहीत. यामुळे राष्ट्रवादीवर (NCP) शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakarey ) यांनी गृह खाते देखील स्वतःकडे घेऊन राज्याला योग्य दिशा द्यावी, अशी भूमिका शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire) यांनी मांडली आहे. (Chandrakant Khaire on State Home Ministry )
राज्यात महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi ) अनेक नेत्यांवर केद्रांतील विविध संस्था कडक कारवाई करत आहेत. यामुळे भाजपला जशासतसे उत्तर द्यावे अशी शिवसैनिकांची भावना आहे. भाजप नेत्यांच्याविरोधात तसे पुरावे देखील देण्यात आले, मात्र राष्ट्रवादीकडे असलेले गृहखाते तत्परतेने कारवाई करत नसल्याची चर्चा शिवसेनेत जोर धरत आहे. तसेच फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतरही गृहमंत्री वळसे पाटील यांनी आक्रमक पद्धतीने पावल उचलली नाहीत. या सर्व घटनांमुळे शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता आहे. आता भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी गृहमंत्रालय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे घ्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोर धरू लागली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहखातं स्वत:कडे घ्यावं, अशी भूमिका उघडपणे शिवसेना नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात गृह मंत्रालय स्वत:कडे ठेवलं होतं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी देखील गृहखातं स्वत:कडे घ्यावं, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.