नवी दिल्ली - भाजपामधून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे. तसेच त्यावरून अरब आणि इस्लामिक देशांमध्ये भारताविरोधा संतापाची लाट उसळली आहे. त्यावरून आज औरंगाबादमध्ये झालेल्या सभेतून भाजपा आणि केंद्र सरकारवर निषाणा साधला आहे. टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढवली आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
भाजपाचं हिंदुत्व आणि नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी मुस्लिमांचा द्वेष करण्यास शिकवलेलं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत. आमच्यासाठी देश हाच धर्म आहे. मात्र धर्माचं वेड घेऊन आमच्या अंगावर आलात तर त्याला प्रत्युत्तर दिला.
त्या कुणीतरी भाजपाच्या टिनपाट प्रवक्त्यांनी प्रेषितांचा अवमान केला. आमच्या देवतांचा अवमान केला तर राग येतो. मग त्यांच्या प्रेषितांचा अपमान करण्याची गरज नव्हती. यानंतर अरब देश एकत्र आले. माफी मागण्याची मागणी केली. भारताच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावला. गुन्हा भाजपाच्या प्रवक्त्याने केला. मग त्यासाठी देशावर नामुष्की कशाला. भाजपाची भूमिका ही देशाची भूमिका असू शकत नाही. टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढवतेय, हे तुम्हाला मान्य आहे का, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.