मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून सातत्याने होणाऱ्या टिकेला उत्तर देताना, आमचं हिंदुत्व हे मनात राम आणि हाताला काम देणारं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, भाजपकडून सुपारी देऊन भोंगा वाजवला जात असल्याची टिकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर मनसेच्या नेत्यांनी टिका करायला सुरुवात केली आहे. सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा ही लवंगीची फुसकी माळ निघाल्याचं म्हटलं आहे.
औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात मोठ्या गर्दीत उद्धव ठाकरेंची स्वाभिमान सभा झाली. या सभेत त्यांनी हिंदुत्त्व, औरंगाबादचा पाणी प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं. भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे आज देशावर नामुष्कीची वेळ आली. बेताल वक्तव्य करणाऱ्या या प्रवक्त्यामुळे देश माफी मागणार नाही. कारण, भाजपचा प्रवक्ता हा देशाचा प्रवक्ता नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी, मनसेसह, राणा दाम्पत्यावरही त्यांनी नाव न घेता टिका केली. आता मनसेकडून या टिकेला आणि एकंदरीत सभेवर भाष्य करण्यात आलं आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन निशाणा साधला. ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, ना शहराच्या नामांतरणावर, ना हुंकार, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा, असे म्हणत देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच नाव न घेता टिका केली.