औरंगाबाद - राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता औरंगाबाद विमानतळावर पोहोचले. त्यांचं जल्लोषात स्वागतही करण्यात आलं. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी नियोजनानुसार दहेगाव आणि पेंढापूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी, शेतकऱ्यांनी आपली नुकसान झाल्याचं सांगत, व्यथाच मांडली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह सरकारवर जोरदार प्रहार केला. तसेच, शेतकऱ्यांनो सरकारवर आसूड चालवा, मी तुमच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंना या दौऱ्यात एका शेतकऱ्याने आसूड भेट देत सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली. त्यावेळी. तुमच्या हाती आसूड आहे, तो तुमच्या हातात शोभून दिसतो. आमच्या हातात फोटोपुरता घेऊन तो शोभणार नाही. तुम्ही तो आसूड दाखवून सरकारला घाम फोडा, यासाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी सराकारला सवाल केला आहे.
ओला दुष्काळ सरकारला दिसत नसेल, दिसत असूनही डोळेझाक करत असेल. माझ्याशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली, निदान बळीराजाशी तरी गद्दारी करू नका. मला कृषीमंत्र्यांची कीव येते, तुम्हाला आसुरी महत्त्वाकांक्षा असतील. पण, ज्या एका कारणासाठी तुम्ही सत्तांतर घडवलं. पण, निदान अन्नदात्याशी तरी गद्दारी करु नका. आणखी काय हवं, म्हणजे तुम्हाला ओला दुष्काळ म्हणावं लागेल. माझा शेतकरी दादा खोटं बोलू शकत नाही हा मला विश्वास आहे. त्यामुळेच, मी ऐन दिवाळीत इथं आलोय, माझ्यासोबत तुम्हीही आल्यानंतर येथील परिस्थिती, सत्य महाराष्ट्राला, देशाला दिसेल,असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
ओला दुष्काळ नक्कीच जाहीर झाला पाहिजे, मी आमची मागणी आहे. अतिवृष्टीमुळे पीकांची नासाडी झालीय, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असा विभाग आहे. हे केवळ प्रतिकात्मक आहे. आता, ओला दुष्काळाचे निकष लावण्यासाठी मंत्र्यांना चिखलात बुचकळून काढायचं का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. निकष लावण्यासाठी नेमकं करायचं काय, हे केवळ सरकार उत्सवी आहे, मी गरज पडल्यास रस्त्यावर उतरेन. मी विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरणार नाही. तर, मी शेतकऱ्यांचा आवाज बनून रस्त्यावर उतरणार, अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी केली.