औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी लोकसभा निवडणूका आणि २५ नोव्हेंबरच्या आयोध्या दौऱ्यासाठी राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मंगळवारी, २३ आक्टोंबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर येत असल्याची माहिती शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवारी सकाळी दहा वाजता लातुर येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. याच दिवशी दुपारी १२ वाजता बीड आणि सायंकाळी ४.३० वाजता औरंगाबादेत मेळावा घेण्यात येणार आहे. औरंगाबादेतील मेळावा सुतगिरणी रोडवरी श्रीहरी पॅव्हेलीयन येथे होणार असल्याचे खा. खैरे यांनी स्पष्ट केले. पदाधिकाऱ्यांशी संवाद आणि आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे.
या दौऱ्यात मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाची पाहणी करण्यात येणार नाही. दुष्काळपाहणीसाठी ३१ आक्टोंबरनंतर दौरा आयोजित केला जाणार आहे. उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबर रोजी राम मंदिराच्या उभारणीसंदर्भात आयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वातावरण निर्मिती करण्यासाठी राज्याव्या दौरा करण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना राज्य उपसचिव राजेंद्र जंजाळ यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.