औरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. जालना, बदनापूर, अंबड येथे शिवसेनेचे आमदार होते. भोकरदन विधानसभा मतदार संघातही शिवसेनेच्या उमेदवाराने चांगले मतदान घेतले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मतदार संघ असलेल्या जालना लोकसभा मतदार संघाची २०२४ ची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. सोमवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याविषयीचे संकेत देत गावागावात जाऊन शाखा सुरू करा, सदस्य नोंदणी करा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक होण्याचे आदेश दिल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीला प्राधान्य देत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले. मागील महिन्यात शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या बैठका त्यांनी घेतल्या. सोमवारी औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघातील जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जालना लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी पदाधिकाऱ्यांनी गावा-गावांत जाऊन पक्षाच्या शाखा उघडाव्यात, सदस्य नोंदणी करावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आंदोलन करावे, असे निर्देश दिले. निवडणुका केव्हाही लागो, तुम्ही तयारी करा, चांगला तगडा आणि ताकदवान उमेदवार मिळेल, असे स्पष्ट करीत जालना लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले.
यावेळी चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, अरविंद सावंत, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, पश्चिम मतदार संघाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, शहरप्रमुख विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, कुलकर्णी, मध्य विभाग शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, शहर संघटक राजू वैद्य, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, जालना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, माजी आ. संतोष सांबरे, हिकमत उढाण, बोराडे, यांच्यासह जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.