औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला करून दहशत माजविणाऱ्या कश्यप गँगची गारखेडा परिसरात मोठी दहशत असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या पाहणीत समोर आले.
मध्य प्रदेशातील मृत गुंडाला आदर्श ठेवून दहशत माजविणाऱ्या या गँगविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी युवा सेनेने पोलीस आयुक्तांकडे केली. दुसरीकडे या गँगच्या दहशतीखाली असलेले नागरिक त्याविषयी प्रसारमाध्यमांसमोर खुलेपणाने बोलत नसल्याचे आढळून आले. शिवाजीनगर परिसरातील साईनगर येथील शुभम विनायक मनगटेवर ५ फेब्रुवारी रोजी रात्री फुकट गुटखा, तंबाखू न दिल्याच्या कारणावरून आरोपी अतिश मोरे, यश पाखरे, नीलेश धस, अनिकेत मोरे, शेख बादशहा, पिन्या खडके आणि अन्य दोन अनोळखी इसमांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला शुभम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या गँगची परिसरात मोठी दहशत आहे.
मध्य प्रदेशातील उज्जैन येथील कुख्यात मृत गुन्हेगार दुर्लभ कश्यपचे गुंड प्रवृत्तीचे हे तरुण ‘फॉलोअर्स’ आहेत. कश्यपसारखे कपाळावर गंध लावणे, कपडे घालून, त्याच्यासारखा ‘अवतार’ करून ही टोळी वावरते. सोशल मीडियावरून ही गँग ऑपरेट होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. रात्री, बेरात्री ही गँग शिवाजीनगर, गारखेडा परिसरातील दुकानदारांना सिगारेट, तंबाखू आणि गुटख्यासाठी धमकावत असते. गँगच्या सदस्यांकडे नेहमी शस्त्रे असतात, यामुळे त्यांच्याविराेधात तक्रार करण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. मंगळवारीही लोकमत प्रतिनिधींनी त्यांच्या घराच्या परिसरात आणि मनगटेंच्या घराच्या परिसरात फेरफटका मारला तेव्हा कश्यप गँगची परिसरात दहशत असल्याचे दिसून आले. या गँगबाबत विचारले तर रहिवाशांनी बोलण्याचे टाळले.
मित्राच्या लग्नात तलवार हातात घेऊन नाचले म्हणून पोलिसांनी प्रथमच कश्यप गँगवर कारवाई केली होती. या कारवाईचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्या गँगने शुभम मनगटेच्या दुकानात दहशत निर्माण केली. तेव्हा शेजारील लोक पुढे आले नव्हते.