लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यात मघा नक्षत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे़ हवामान विभागानेही अतिवृष्टीचा इशारा दिला होता़ त्यामुळे महामंडळाच्या सेवेवरही परिणाम झाला आहे, परंतु भोकर आगाराच्या भोकर- सोलापूर बसमध्ये प्रवाशांना वेगळाच अनुभव आला़ प्रवासात अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे बसचे छत जागोजागी गळत होते़ त्यामुळे अनेकांनी बसमध्ये चक्क छत्र्या उघडून पावसापासून बचाव केला़ तर अनेकांना भिजण्याशिवाय पर्याय नव्हता़महामंडळाकडून भंगार बसेसद्वारेच लांब पल्ल्याची वाहतूक करण्यात येते़ त्यामुळे लांब पल्ल्यासाठी प्रवासी खाजगी वाहनांना अधिक पसंती देतात, परंतु ग्रामीण भागात आजही एसटीशिवाय पर्याय नाही, परंतु त्यांनाही एसटी महामंडळाच्या उदासीन धोरणांचा अनेकवेळा फटका बसतो़भोकर आगाराची भोकर-सोलापूर (क्र.एम़एच़२० बी़एल़१२६५) ही बस शनिवारी आगारातून सोडण्यात आली़ भोकरपासून जवळपास पंधरा किमी अंतरावर बस गेली असताना अचानक पाऊस सुरु झाला़ त्यात बसच्या छताला अनेक ठिकाणी गळती लागली़ खिडक्यांच्या काचाही तुटलेल्या होत्या तर काही ठिकाणी जाम झाल्या होत्या़ त्यामुळे बसमध्ये सर्वच बाजूने पाण्याचा मारा सहन करावा लागत होता़ यावेळी बसमधील ज्या प्रवाशांकडे छत्र्या होत्या त्यांनी आपल्या आसनावर छत्र्या उघडून बसावे लागले़ तर अनेकांकडे छत्र्या नसल्यामुळे भिजण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता़ बसमध्ये प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे पाय हलवायलाही जागा नव्हती़ अशा परिस्थितीत जो-तो पावसापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करीत होता़ अनेक प्रवाशांच्या बॅगा आणि साहित्यही भिजल्यामुळे नुकसान झाले़ याबाबत प्रवाशांनी मात्र संताप व्यक्त केला़ दरम्यान, महामंडळाकडे असलेल्या अनेक बसेसच्या छताला जागोजागी मोठमोठी छिदे्र पडली आहेत़ त्याची दुरुस्ती करण्याकडे महामंडळाने दुर्लक्ष केल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो़
बसमध्येच प्रवाशांनी उघडल्या छत्र्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:11 AM