औरंगाबाद : आष्टी (जि. बीड) येथून वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले शेख महंमद शफी शेख अब्दुल रज्जाक यांच्याकडे १३ लाख १७ हजार ३०० रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. शेख महंमद यांच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत ही मालमत्ता उघडकीस आली. शेख महंमद यांच्यासह त्यांच्या दोन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक रामनाथ चोपडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात शेख महंमद यांच्यासह त्यांची पत्नी रिहाना बेगम महंमद शफी, मुलगा महंमद साजेद महंमद शफी व महंमद तौफिक महंमद शफी (सर्व रा. टाइम्स कॉलनी, औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आष्टी येथे कार्यरत असताना शेख महंमद यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार विभागाला प्राप्त झाली होती. त्यावरून शेख महंमद यांची उघड चौकशी करण्यात आली. शेख महंमद हे २६ आॅक्टोबर १९७८ मध्ये वन विभागात वनरक्षक म्हणून नोकरीस लागले. नियत कालावधीत त्यांना वनपाल, वनक्षेत्रपाल व १९९९ मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. १९७८ ते २००९-१० या नोकरीच्या कालावधीत त्यांनी ही बेहिशेबी मालमत्ता जमा केली. टाइम्स कॉलनीत त्यांनी स्वत:च्या नावे तीन मजली इमारत, तीसगाव येथे प्लॉट, मुलगा साजेद याच्या नावावर भावडी (ता. हवेली, जि. पुणे) येथे प्लॉट आणि बिल्डा येथे एक एकर शेती घेतली. मुलगा तौफिक याच्या नावावर ओहर (ता. जि. औरंगाबाद) येथे एक हेक्टर ६५ आर शेतजमीन खरेदी केली. पत्नी रिहानाबेगम यांच्या नावे शिवना येथे १ हेक्टर ४५ आर शेतजमीन, घरात अल्टो कार, इंडिका कार, चार दुचाकी मोटारसायकल आदी मालमत्ता आढळून आली. शेख यांच्या टाइम्स कॉलनीतील इमारतीच्या झडतीत १५ लाख रुपये रोख सापडले असून, वेगवेगळ्या गावांत असलेल्या त्यांच्या सर्व मालमत्तांची झडती घेण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबाच्या नावे असलेल्या बँक खात्यांची माहिती घेतली जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक संजय नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक, प्रवीण मोरे, प्रकाश कुलकर्णी, सुरेश वानखेडे, साईनाथ ठोंबरे, विवेक सराफ, पोलीस निरीक्षक भरत राठोड, किशोर पवार, राजपूत, प्रमोद पाटील, नीलेश देसले, श्यामसुंदर टाक, अनिता वराडे, वैशाली पवार यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. पोलीस निरीक्षक भरत राठोड अधिक तपास करीत आहेत.
निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे बेहिशेबी मालमत्ता
By admin | Published: October 22, 2014 12:40 AM