लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव संमत करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अविश्वास ठराव आणण्यासाठी सर्वपक्षीय जि.प. सदस्यांना विश्वासात घेतले जाणार असून, यासाठी सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी विशेष सभेसाठी पत्र तयार केले जाईल, असे बांधकाम सभापती विलास भुमरे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सत्ताधारी सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोेलन केले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्ते जि.प. सभापती व सदस्यांना ताब्यात घेऊन क्रांतीचौक ठाण्यात नेले. त्यानंतर तेथे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सदस्यांना सोडून दिले.तेथून ते सर्व सदस्य जिल्हा परिषदेत आल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांच्याविरोधात आणखी मोहीम तेज केली. सदस्यांना अटक करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पोलिसांना जिल्हा परिषदेत बोलावले. याचा राग सदस्यांच्या मनात खदखदत आहे.यासंदर्भात बांधकाम सभापती विलास भुमरे पाटील म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषद प्रशासनाचे प्रमुख आहेत. ते जि.प. सदस्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. सदस्यांना कधीही त्यांनी विश्वासात घेतलेले नाही.केवळ दलित वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेअभावी पडून नाहीत, तर आरोग्य, शिक्षण, सिंचन, बांधकाम आदी एकाही विभागावर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. केवळ स्वच्छता मिशनवरच त्यांनी आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केलेले आहे. तेवढाच विभाग जिल्हा परिषदेत कार्यरत आहे का, असा प्रश्न उपस्थित करून भुमरे पाटील म्हणाले की, हगणदारीमुक्त जिल्हा मोहिमेंतर्गत शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी ग्रामसेवक, सरपंचांना वेठीस धरले आहे. यासाठी पुरेसा निधी नसतानादेखील हजारो शौचालयांची कामे पूर्ण केली.आता लाभार्थी अनुदान मागणी करीत असल्यामुळे ग्रामसेवक-सरपंचांना गावात वावरणे अवघड झाले आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना समुपदेशन पद्धतीच्या नावाखाली चुकीच्या पदस्थापना देण्यात आल्या आहेत. एकंदरीत सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस सदस्यांप्रमाणेच भाजपचे सदस्यही मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत, असे ते म्हणाले.
अविश्वासाच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:23 AM