- विकास राऊत
औरंगाबाद : मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पावणेदोन वर्षापूर्वी दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डीएमआयसीअंतर्गत आॅरिक सिटी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे विविध उद्योगांशी सामंजस्य करार केले. मेक इन इंडिया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्रांतर्गत केलेल्या त्या करारांचे पुढे काय झाले, याबाबत अनिश्चितता आहे. मंदी व जीएसटीमुळे काही उद्योगांनी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करूनही पुढील पाऊल उचलले नसल्याची चर्चा उद्योगवर्तुळात आहे.
कोट्यवधी रुपये गुंतवणुकीचे अनेक करार विविध उद्योगांसोबत झाल्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड, लातूरमध्ये औद्योगिक उलाढालीसह रोजगार निर्मितीला चालना मिळण्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. मात्र, पुढे या करारांचे काय झाले, गुंंतवणुकीतून उभे राहिलेले उद्योग सुरू झाले की नाही, याची कोणतीही माहिती डीएमआयसी, एमआयडीसीकडे आजघडीला उपलब्ध नाही. हमदर्द, पॅरासन, बीकेटी, सीटीआरसोबतच जालन्यातील स्टील उद्योगांतील गुंंतवणुकीचा समावेश होता. ३१०० जणांना रोजगार देण्याची क्षमता त्या प्रकल्पांत होती. २ लाख ४६ हजार चौ.मी. जागा या उद्योगांना दिल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. लातूरमध्ये १३९ हेक्टर जागा अतिरिक्त एमआयडीसीमध्ये रेल्वे कोच निर्मितीच्या उद्योगासाठी दिली; परंतु त्यातून अजून उत्पादन सुरू झाले नाही.
अँकर प्रकल्प ह्योसंगही मंदगतीनेकोरियन कंपनी ‘ह्योसंग’ हिने शेंद्र्यामध्ये ३ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा करार केला आहे़ आॅरिकसाठी ‘ह्योसंग’ हा अँकर प्रोजेक्ट ठरेल, असे बोलले जात असले तरी या प्रकल्पाची गती अजून मंदच आहे. टेक्सटाईल क्षेत्रातील कोरियन कंपनी ह्योसंगचा १०० एकर जागेत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून एक हजार जणांना रोजगार मिळेल, असा दावा करण्यात येत आहे. तसेच ई-व्हेईकल क्षेत्रातील परदेशी कंपनी लोम्बोर्गिनी येथे मोठी गुंतवणूक करणार असल्याचा दावा मध्यंतरी उद्योग खात्याने केला होता.
एमआयडीसीचे मत असे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, किती करार झाले, याची माहिती सध्या तरी नाही. माहिती घेऊन नेमके काय झाले हे सांगता येईल.
डीएमआयसीचे मत असेडीएमआयसीचे सहसंचालक गजानन पाटील यांनी सांगितले, डीएमआयसीअंतर्गत आॅरिक सिटीमध्ये ५२ कंपन्यांसोबत एमओयू केले होते. त्यांना जागा दिली आहे. त्या कंपन्या तेथे आल्या आहेत. काही कंपन्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. एमआयडीसीने कुणासोबत करार केले, याबाबत मला सांगता येणार नाही.