औरंगाबाद : मुंबईपेक्षा औरंगाबादमध्ये सोने-चांदीचे भाव जास्त असतात. मात्र, आता परिस्थिती उलटी झाली आहे. मुंबईपेक्षा शहरात चांदी प्रतिकिलो ३ हजार रुपयांनी कमी किमतीत मिळत आहे. कारण, भावातील अनिश्चिततेमुळे चांदी व सोन्याची मागणी कमी झाली आहे. अनेक सराफा व्यापारी असे आहेत की, त्यांच्याकडे सायंकाळपर्यंत बोहणीही होत नाही. यामुळे व्यापाऱ्यांनी आपला नफा कमी करून चांदी विक्री सुरू केली आहे.
गुरुवारी सकाळी टीव्ही चॅनलवर मुंबईत चांदीचे भाव ६५ हजार रुपये प्रतिकिलो होते. मात्र, शहरात सराफा बाजारात फेरफटका मारला तर व्यापारी चांदी ६२ हजार रुपयांना विकत होते. तसेच सोने सकाळी मुंबईत ५१८०० रुपये प्रति १० ग्रॅम भाव निघाला होता. त्याच वेळी शहरात मात्र, सोने ५१२०० रुपयांना विकले जात होते. म्हणजे ६०० रुपये कमी किमतीत विकले जात होते. केवळ ग्राहकी नसल्याने व्यापारी कमी दरात चांदी व सोने विकत असल्याचे आढळून आले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने व चांदीच्य भावात मोठी तेजी व नंतर अचानक मंदी येत आहे. यामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी, ज्यांना सोने-चांदी खरेदी करायचे आहे त्यांनी हात आखडता घेतला आहे. त्यात आता पितृपक्ष सुरू झाला आहे. यामुळे सराफा बाजारात सायंकाळपर्यंत बोहणी होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सराफा व्यापाऱ्यांकडे जुन्या भावातील सोने-चांदी खरेदी केलेली आहे. हे व्यापारी आपला नफा कमी करून त्यास विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. यास अंडरकटिंगमध्ये विक्री करणे असे म्हणतात, असे काही सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. एका सराफा व्यापाऱ्याने सांगितले की, मागील महिन्यात भारताने ६० टन सोने आयात केले. परिणामी, महिनाभरात सोन्याचे भाव ५५९५० रुपयांहून खाली उतरले. चांदी ७२ हजारांहून खाली आली.
वर्षभरात चांदी ३३ हजारांनी वाढलीमागील वर्षी आॅगस्ट २०१९ मध्ये चांदी ३९ हजार रुपये किलो, तर सोने ३८ हजार रुपये प्रति १० ग्रॅम विकले गेले. गुरुवारी दुपारी चांदी ६२००० रुपये तर सोने ५१२०० रुपये विकले जात होते. मागील वर्षभराचा विचार केला, तर चांदी किलोमागे ३३००० रुपये तर सोने १३२०० रुपयांनी वाढले.