लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : चौदाव्या वित्त आयोगाचे दोन लाख आणि शासनाने टंचाईकाळातील उपाययोजनेतून मंजूर केलेले २८ लाख असे ३० लाख रुपये खर्चून तयार केलेली पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतच्या अंतर्गत वाद, काही लोकांना लागणारी टक्केवारी व नियोजनाअभावी रखडली आहे. यामुळे उंडणगाव येथे पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टँकर मागवून व डोंगरदऱ्यात मिळेल तेथून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे.२०१७ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्पात पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतची विहीर खोदण्यात आली होती. त्या विहिरीत आजही मुबलक पाणी आहे. तरीही येथील नागरिक तहानलेले आहेत. या पाणीपुरवठा योजनेचे काम अंदाजपत्रकानुसार झालेले नाही. हे काम ज्या ठेकेदाराच्या नावावर आहे त्याऐवजी दुसºयाच ठेकेदाराने हे काम निकृष्ट केले आहे. त्यात अनेक अनियमितता आहेत. ३३ एच.पी. ऐवजी १५ एच पी.ची मोटार टाकण्यात आली. विहिरीपासून उंडणगावपर्यंत १ हजार ९०६ मीटर पाईपलाईन टाकण्यात आली. ती जागोजागी उखडत आहे.कमी खोल केली आहे. योजनेतील पंप हाऊस, पाण्याचा हौद झालेला नाही. पाईपलाईन उखडून १ महिना झाला तरी त्याची जोडजाड झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या ताब्यात योजना दिली नाही. आर्थिक देवाण घेवाण, टक्केवारी, अंतर्गत वाद, ढिसाळ नियोजन यामुळे योजना कार्यान्वित होऊनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असा आरोप शिवसेनेचे सर्कल प्रमुख पंकज जैस्वाल यांनी केला आहे.उंडणगाव हे बाजारपेठेचे गाव आहे. या गावात भीषण पाणीटंचाई असल्याने विशेष निधीतून लाखो रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. खेळणा मध्यम प्रकल्पातून पाईपलाईन टाकण्याचे काम १९ मे रोजीच पूर्ण झाले होते. पण ग्रामपंचायतीच्या अंतर्गत वाद व नियोजनाअभावी पावसाळा सुरू झाला तरी या योजनेचे पाणी नागरिकांना मिळाले नाही. शासनाने उंडणगावात बालाजी उत्सव, रमजानमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी तात्काळ टेंडर काढून ही योजना मंजूर केली होती. पण त्यात वरील कारणामुळे शासनाचा हेतू साध्य झाला नाही.४पाणीटंचाईबाबत नागरिकांनी यापूर्वी काढलेला हंडा मोर्चा, ३० मेपर्यंत पाणी देण्याची दिलेली हमी, दोन वेळा दिलेल्या निवेदनाला ग्रामपंचायतीने दाखविलेली केराची टोपली, सध्या जाणवत असलेली पाणीटंचाई या सर्व बाबींना कंटाळून सोमवारी (दि.२५) उंडणगाव ग्रामपंचायतीला गावकरी टाळे ठोकणार असल्याचा इशारा शिवसेनेचे उंडणगाव सर्कलप्रमुख पंकज जैस्वाल, माजी सरपंच राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, शिवाजी शिंगारे, गोपाल जाधव, गजानन शिंगारे, कृष्णा जाधव, विश्वनाथ पाटील, संजय भोरखडे, नाना सनान्से, दिलीप सनान्से आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामपंचायतीला टाळे ठोकूनही ४ जुलैपर्यंत पाणी मिळाले नाही तर साखळी उपोषण करून सरपंच, उपसरपंचांचे राजीनामे मागणार असल्याचा इशारा जैस्वाल यांनी दिला आहे.आठ दिवसांत नागरिकांना मिळेल पाणीग्रामपंचायतीने ३३ एचपीची मोटार मागविली आहे. ती येताच नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळेल. यामुळे ग्रामपंचायतीला कुलूप लावू नये. २ ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. त्याबाबत ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. ठेकेदाराने अजून ही योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेली नाही. -डी. जे. बोराडे,ग्रामविकास अधिकारी
उंडणगाव पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 1:20 AM