औरंगाबाद : ग्रामीण भागांप्रमाणेच आता शहरातदेखील विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. सलग चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्रीही अनेक भाग अंधारात बुडाले. शहरात आधीच उन्हाच्या पाऱ्याने उचांकी पातळी गाठली आहे. त्यात सतत वीज गुल होत असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, महावितरण कंपनीने मात्र, वीजपुरवठा खंडित होण्यास महापारेषण कंपनीच्या केंद्रांमधील तांत्रिक बिघाडच कारणीभूत असल्याचा खुलासा केला आहे. मागणीपेक्षा विजेची उपलब्धता कमी झाल्यामुळे महावितरण कंपनीने जिल्ह्यात पुन्हा लोडशेडिंग घेण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात पाच दिवसांपासून सरासरी ५ ते ९ तास वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येत आहे. औरंगाबाद शहर मात्र, लोडशेडिंगमुक्त आहे. तरीदेखील चार दिवसांपासून सातत्याने शहरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. सलग १७, १८ आणि १९ मे रोजी रात्रीच्या वेळी शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. बीड बायपास, सातारा, देवळाई, पन्नालालनगर, सूतगिरणी, शिवाजीनगर, गारखेडा, आकाशवाणी, तसेच रोशनगेट, बायजीपुरा, शहागंज यासह निम्मे शहर अंधारात बुडाले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्रीदेखील सातारा, देवळाईसह काही भागांतील वीज वारंवार जात होती. तिन्ही दिवस काही भागांत एक तास तर काही भागांत दोन-दोन तास वीज नव्हती. महापारेषण कंपनी म्हणते...महापारेषण कंपनीचे मुख्य अभियंता जी. टी. मुंडे यांना महावितरण कंपनीच्या दाव्याविषयी विचारणा केली असता, त्यावर मुंडे म्हणाले की, महापारेषण पडेगाव आणि चित्तेगाव येथील केंद्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. परंतु एका केंद्रातील बिघाड हा अवघ्या ४५ मिनिटांत सुरळीत करून महावितरणच्या केंद्राकडील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. तसेच पडेगाव येथील इक्विपमेंट फेल्यूअरही कमीत कमी वेळेत दुरुस्त करण्यात आले. मात्र, इतर काही भागांत महावितरणचे पोल पडले तसेच काही भागांत झाडे तुटून विद्युत वाहिन्यांवर पडली. त्यामुळे सर्वच ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होण्यास महापारेषणचा बिघाड कारणीभूत नाही. महावितरण कंपनी म्हणते... १७ मे रोजी महापारेषणच्या २२० केव्ही चित्तेगाव उपकेंद्रातील आयसीटी- १ व २ चे १३२ केव्ही बी फेज सीटीला आग लागल्यामुळे ट्रीप झाले. त्यामुळे महापारेषणचे १३२ केव्ही सातारा उपकेंद्र बंद पडले. परिणामी बीड बायपास, पन्नालालनगर, सूतगिरणी, शिवाजीनगर, गारखेडा, आकाशवाणी इत्यादी भागांतील वीजपुरवठा बंद पडला. तसेच एमजीएम परिसरातील हर्सू्लवरून निघणाऱ्या ३३ केव्ही सिडको विद्युत वाहिनीवर निलगिरीचे झाड पडले. त्यामुळे रोशनगेट, बायजीपुरा ३३ केव्ही उपकेंद्र बंद पडल्यामुळे शहागंज, रोशनगेट, बायजीपुरा इत्यादी भाग बंद पडला. हा वीजपुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सुरळीत केला. १८ मे रोजी सायंकाळी महापारेषण २२० केव्ही पडेगाव उपकेंद्रातील आर व वाय फेजच्या सीटी जळाल्यामुळे महापारेषण २२० केव्ही सावंगी व १३२ केव्ही हर्सूल व १३२ केव्ही चिकलठाणा हे उपकेंद्र बंद पडले. त्यामुळे भडकलगेट, औरंगपुरा, निराला बाजार, जटवाडा भागातील विद्युत पुरवठा बंद पडला.
अघोषित लोडशेडिंग
By admin | Published: May 22, 2016 12:28 AM