लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीद्वारे विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याची कोणतीही ठराविक वेळ राहिली नसून, मनमानी पद्धतीने कोणत्याही वेळी आणि दिवसातून कितीही वेळा वीज गूल होत असल्याने नागरिक हतबल झाले आहेत. याविषयी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रारी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.दर महिन्याला भरमसाट येणारी वीजबिले, त्या तुलनेत सतत खंडित होणारा वीजपुरवठा, अंदाजे वीज बिल आल्यानंतर संबंधित कार्यालयात गेलेल्या सामान्य ग्राहकांना मिळणारी सापत्न वागणूक अशा अनागोंदी कारभारामुळे कायमच टीकेचे धनी झालेल्या महावितरण कंपनीच्या वैजापूर येथील कार्यालयाचा कारभार सुधारत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.अचानक होणारे लोडशेडिंग, तांत्रिक बिघाड झाल्यास तासन्तास खंडित राहणारा वीजपुरवठा यामुळे नागरिक कैचीत सापडले आहेत. मीटर रीडिंग घेणाºया ठेकेदाराकडूनही ग्राहकांना चांगलेच कोंडीत पकडले जात आहे. जाणीवपूर्वक अंदाजित रिडिंग टाकून पुढील देयकात अधिक युनिट दाखवून अधिकचा दर आकारण्याचा प्रकार चालविला जात आहे. हा सर्व प्रकार येथील उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना हाताशी धरून केला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.वरिष्ठ अधिकाºयांनी चौकशी करण्याची मागणी होत आहे. वीजबिलाच्या वसुलीप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा करावा,अशी मागणी वैजापूर परिसरात जोर धरू लागली आहे.नागरिक संतापलेमहावितरणने शुक्रवारी व शनिवारी दिवसभर अघोषित भारनियमनाचे चटके वैजापूरकरांना दिल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत आहे. दुपारच्या वेळात चार ते पाच तास सलग बत्ती गुल करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. महावितरणच्या कार्यालयातूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ग्राहकांचा संताप शिगेला पोहोचला आहे.
वैजापूरकरांना महावितरणकडून अघोषित भारनियमनचा ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 1:00 AM