औरंगाबाद : भारताला अंडर १९ वर्ल्डकप जिंकून देण्यात निर्णायक योगदान देणारा ‘मराठवाडा एक्स्प्रेस’, तेजतर्रार गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर याला आपल्या संघात घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जने रविवारी तब्बल दीड कोटी मोजले. लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगसाठी निवड झालेला राजवर्धन हा मराठवाड्याचा आतापर्यंतचा पाचवा खेळाडू ठरला आहे. आज बंगलोर येथे झालेल्या बोली प्रक्रियेत राजवर्धन हंगरगेकरला आपल्या संघात घेण्यासाठी तुल्यबळ मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स या संघात चुरस होती. राजवर्धन हंगेरकर याची पदार्पणातच ३० लाख बेस प्राइज असतानाही चेन्नई सुपरकिंग्जने त्याला दीड कोटी रुपयांत आपल्या संघात खेचले. या निवडीमुळे भारताचा माजी कर्णधार व स्फोटक फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधी त्याला मिळणार आहे.
वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या यशातही राजवर्धनने निर्णायक योगदान दिले. त्याने प्रारंभीच भेदक गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करण्यापासून रोखले. या स्पर्धेत त्याने पाच गडी बाद केले. तसेच आयर्लंडविरुद्ध १७ चेंडूंत पाच षटकार व एका चौकारांसह नाबाद ३९ धावांची खेळी करताना फलंदाजीत चमक दाखवली.
विजय हजारे करंडक स्पर्धेत चमकराजवर्धन हंगरगेकर याने गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात सिनिअर गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत पाच सामन्यात दहा गडी बाद करीत चमकदार कामगिरी केली. त्याने पर्दापणातच हिमाचल प्रदेशविरुद्ध ४२ धावांत चार गडी बाद केले. तसेच याच स्पर्धेत पाँडेचेरीच्या चार फलंदाजांना ४५ धावांत तंबूत धाडले.
मराठवाड्याचा पाचवा खेळाडूराजवर्धन हंगरगेकर हा आयपीएलसाठी निवड झालेला पाचवा खेळाडू आहे. याआधी बीड जिल्ह्यातील मात्र, सुरुवातीच्या काळात औरंगाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजय बांगरने २००८ व २००९ मध्ये अनुक्रमे डेक्कन चार्जर्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच २०१२ मध्ये १९ वर्षांखालील विश्वविजेत्या संघाचे प्रतिनिधित्व करणारा व २०१४ साली अंडर १९ संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या जालना येथील विजय झोलने २०१२ ते २०१४ दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. नांदेड येथे जन्मलेल्या श्रीकांत मुंडेची पुणे वॉरियर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात निवड झाली होती. तर महाराष्ट्र रणजी संघाचे कर्णधारपद भूषवणारा अंकित बावणे याने २०१७ च्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
आक्रमक फलंदाजी जमेची बाजूराजवर्धन हंगरगेकर याने १४ व १६ वर्षांखालील उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना सलामीला फलंदाजी करताना चमक दाखवली आहे. तेजतर्रार गोलंदाजीप्रमाणेच आक्रमक फलंदाजी हेदेखील त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मूळचा तुळजापूरचा असणारा राजवर्धन लहानपणी उस्मानाबाद येथे स्टेडियममध्ये वडिलांसोबत फिरायला यायचा. त्यादरम्यान त्याने वडिलांकडे क्रिकेट खेळण्याचा हट्ट केला. फारशी सुविधा नसतानाही त्याने घेतलेली झेप ही अभिमानास्पद आहे. तेजतर्रार गोलंदाजी, त्याचबरोबर बाऊन्सर, इनस्विंग व आऊट स्विंग गोलंदाजी यांचे योग्य मिश्रण तसेच जोडीला तडाखेबंद फलंदाजी ही त्याची जमेची बाजू आहे. आगामी काळात तो नक्कीच सिनिअर भारतीय संघात खेळताना दिसेल, असा विश्वास राजवर्धनचे प्रशिक्षक राम हिरापुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.