वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात गुरुवारी (दि.२९) पाणीपुरवठा करणारी अंतर्गत जलवाहिनी फुटल्याने शेकडो लीटर पाण्याची नासाडी झाली. दुरुस्तीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
सिडको प्रशासनाकडून जलकुंभापासून अंतर्गत जलवाहिनी टाकून महानगर १ मधील एमआयजी, एलआयजी, जिजामाता नगर, सारा वृदांवन, सारा गौरव आदी नागरी वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी या भागाला पाणी सोडण्याचा दिवस होता. सकाळी १० वाजेच्या सुमारास या भागाला पाणी सोडण्यात आले.
परंतू जलकुंभ ते शिवाजी चौक मुख्य रस्त्यावर स्वामी समर्थ हौ.सो. जवळ जलवाहिनी फुटली. रहिवाशांनी ती थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा दाब जास्त असल्याने गळती थांबविणे शक्य झाले नाही. जवळपास दीड ते दोन तास पाण्याची गळती सुरु असल्याने रस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहत होते.
अखेर या भागाचा पाणीपुरवठा बंद केल्यानंतर ही गळती थांबली. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहून गेल्याने शेकडो लीटर पाणी वाहून गेले दरम्यान, एमआयडीसी प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.