औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १४८ कोटी रुपयांची विविध विकास कामे महापालिकेला करायची आहेत. या कामांच्या निविदा कोणी काढाव्यात यावरून वाद निर्माण झाला होता. शासनाच्या आयटी कॉर्पोरेशनने या कामांवर दावा केला होता. शुक्रवारी स्मार्ट सिटी मिशनच्या संचालकांनी महापालिकेनेच या निविदा प्रसिद्ध कराव्यात, असे आदेश दिले.
शहरात १९०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही लावणे, बसस्थानक अद्ययावत करणे, विविध भागांत वायफाय यंत्रणा उभारणे, आदी कामे १४८ कोटी रुपयांमध्ये करण्यात येणार आहेत. या कामांचे सर्व डीपीआर तयार आहेत. ३१ जानेवारी रोजी स्मार्ट सिटीच्या बैठकीत या कामांना अंतिम मंजुरी मिळणार आहे. या कामांच्या निविदा आयटी कॉर्पोरेशनमार्फत काढाव्यात असा आदेश शासनाच्या आयटी विभागाने मनपाला दिला होता. त्वरित ७० कोटी रुपये आयटी कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित करावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. या मागणीला मनपाच्या पदाधिकार्यांनी जोरदार विरोधही दर्शविला होता. स्मार्ट सिटीसाठी नेमण्यात आलेल्या एसपीव्हीने मिशनच्या संचालकांचे मार्गदर्शन केले. शुक्रवारी त्यांनी ही सर्व कामे एसपीव्हीमार्फतच करावीत, असे आदेश दिले.
स्मार्ट सिटी मिशनचे संचालक समीर शर्मा यांनी ही कामे एसपीव्हीमार्फ त करण्यात यावीत, असे पत्र नगर विकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांना दिले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतील १४८ कोटींच्या कामांच्या निविदा काढण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.