औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीत उद्योगांसाठी भूमिगत विद्युत केबलचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. उद्योगांसाठी भूमिगत केबल प्रदान करणारी आॅरिक सिटी देशातील पहिले शहर ठरणार आहे.
उत्पादनासाठी उद्योगांना २४ तास आणि गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा महत्त्वाचाठरतो. ‘आॅरिक’मध्ये उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे काम गतीने सुरू आहे. यामध्ये ‘आॅरिक सिटी’ची विद्युत यंत्रणा उभारण्याचे काम सुरूकरण्यात आले आहे. येथील औद्योगिक विस्ताराला गती मिळत असताना विद्युत वितरणासाठी उपकेंद्राचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये पाच उपकेंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. मे महिन्यात तीन उपकेंद्र उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. हे काम महिनाभरात पूर्णत्वास नेले जाणार आहे.
मुख्य रिसिव्हिंग स्टेशनमधून निघणाऱ्या विजेचे वितरण करण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. या ठिकाणी आॅटोमोबाईल, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, अन्न व प्रक्रिया उद्योग सुरूहोणार आहे. या उद्योगांना भूमिगत विद्युत केबल नेटवर्क द्वारे वीज प्रदान करण्यात येणार आहे.
आॅरिक सिटीत एकूण जमिनीपैकी ६० टक्के उद्योग, तर ४० टक्के निवासी, सामाजिक-सांस्कृतिक उद्देशांसाठी जमिनीचा वापर केला जाणार आहे. यात कामगार वर्गासाठी निवासव्यवस्था, कंपन्यांसाठी, त्यांच्या पाहुण्यांसाठी मोठी वसाहत असेल. रस्ते, पदपथ, पथदिवे, जलनिस्सारण व्यवस्था आदी पायाभूत सुविधांचे ७० टक्क्यांवर काम पूर्ण झाले आहे. याबरोबर आॅरिक सिटीत पाणीपुरवठ्याचे विशेष नियोजन करण्यात येत आहे.सप्टेंबरपासून ‘आॅरिक’ला जायकवाडीचे पाणी देण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे.