लातूर : निलंगा तालुक्यातील शिवनी कोतल, हाडगा, वडगाव येथे सोमवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास अचानकपणे भूगर्भातून आवाज आला. त्यामुळे भूकंप झाला असेल, या भीतीने नागरिक घराबाहेर पडले. आवाजामुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे.
गेल्या आठवड्यात निलंगा तालुक्यातील हासुरी येथे चार ते पाचवेळा भूगर्भातून आवाज आला होता. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांसह विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन माहिती घेतली होती. तसेच नागरिकांनी भीऊ घेऊ नये. काळजी घ्यावी, असे आवाहन केले होते.
सोमवारी सकाळी ११.३० वा.च्या सुमारास निलंगा तालुक्यातील शिवनी कोतल, हाडगा, वडगाव येथे भूगर्भातून आवाज झाला. नागरिक तात्काळ घराबाहेर पडले. या घटनेची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. दरम्यान, तहसीलदारांनी ही माहिती आपत्ती व्यवस्थापन केंद्राला दिली. यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी म्हणाले, भूगर्भातील आवाजाची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या भूकंप केंद्रास देण्यात आली आहे. दिल्लीहून अधिकृत माहिती घेतली जात आहे. त्याचबरोबर विद्यापीठ केंद्रासही कळविण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन केले आहे.