औरंगाबाद : महावितरणने शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतल्यापासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दररोज विविध भागांतील शेकडो कुटुंबांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. महावितरणच्या या कारभाराविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.महावितरणने ताबा घेतल्यापासून दररोज कोणत्या ना-कोणत्या भागात तीन-चार तास वीजपुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे शहरात अघोषित लोडशेडिंग सुरू केली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुरुस्ती, विद्युत तारेला लागून असणाऱ्या झाडांची कापणी करणे, अचानक निर्माण झालेले प्रश्न इ. कारणांमुळे अनेक भागांचा तीन-चार तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन दिवस सातारा परिसर, मुकुंदवाडी, जय भवानीनगर, पुंडलिकनगर, सिडको एन-२,३,४, रेल्वेस्टेशन, सूतगिरणी, शिवाजीनगर या परिसरातील वीजपुरवठा खंडित होता. जीटीएलकडून महावितरणने १५ नोव्हेंबर रोजी शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतला. त्यानंतर ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यासाठी ज्युबिली पार्क कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. कक्षात रोज जवळपास शंभर तक्रारी येतात. शहरातील विविध भागांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याचे तक्रारींच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. नियंत्रण कक्षात संपर्क साधल्यानंतरही लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत होत नाही, अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे कंपनीच्या कारभाराविषयी ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अघोषित लोडशेडिंगने शहरवासीय त्रस्त
By admin | Published: January 02, 2015 12:40 AM