औरंगाबाद : अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना केम्ब्रिज उड्डाणपुलाच्या लोहमार्गावर घडली. मयूर विलास देसले (२८ रा. रोशनी हाउसिंग सोसायटी, विशालनगर) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव असल्याची माहिती एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
मयूर याने माहिती तंत्रज्ञान विषयात अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तो नोकरीच्या शोधात होता. त्याने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या, मात्र सतत अपयश येत होते. त्याच्या सोबतचे मित्र नेकरीला लागले होते. सततच्या अपयशामुळे तो खचून गेला होता. त्यातूनच तो मागील चार दिवसांपासून घरी कोणाला काहीही न सांगता निघून गेला होता. कुटुंबीयांनी त्याचा नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. त्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी मयूर बेपत्ता झाल्याची तक्रार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस त्याचा शोध घेत असताना शुक्रवारी पहाटे त्याचा मृतदेह केम्ब्रिज शाळेजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली आढळून आला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार पी. एन. अवचार करीत आहेत.
मित्रांमध्ये हळहळमयूरने नोकरीसाठी ५० पेक्षा अधिक ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या, मात्र त्याला सतत अपयश येत होते. त्यातून तो निराश झाला होता. त्याला सर्व मित्र नेहमी नोकरी मिळावी म्हणून प्रोत्साहन देत होते. ‘त्याला आज ना उद्या नोकरी मिळाली असती, पण त्याने असे करायला नको होते,’ अशी प्रतिक्रिया त्याच्या मित्रांनी व्यक्त केली.