औरंगाबाद : चार..पाच वर्ष झाले स्पर्धा परीक्षांचा तयारी सुरू आहे. आता जागा निघतील. नंतर निघतील. या आशेवर अभ्यास सुरूच आहे. परंतु जागा काढण्याऐवजी बंदी घालण्यात येत आहे. चालु वर्षात एकही जागा निघणार नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संतापलेल्या युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर ‘अभ्यास चालु ठेवा’ आंदोलन केले.
‘लोकमत’मध्ये ‘बेरोजगारी’ नावाने तीन दिवसांची वृत्त मालिका प्रकाशित झाली. यातुन स्पर्धा परीक्षांतील वास्तव समोर आल्यामुळे विद्यापीठातील अभ्यासीकेत अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ‘अभ्यास चालु ठेवा’ आंदोलन केले. या आंदोलनाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रसने पाठिंबा दिला होता. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे सामुहिक वाचन करत राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला.
यानंतर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यामार्फत राज्यपालांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहाराध्यक्ष दत्ता भांगे , राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसचे मयुरेश सोनवणे, अमोल दांडगे, दिपक बहीर यांच्यासह सोनाजी गवई, रमेश कांबळे, अजय तुरूकमाणे, गोवर्धन भुतेकर, बालाजी मुळीक, यशोदीप पाटील, मंगेश शेवाळे, संदीप वाघ, पंकज लोखंडे, दिक्षा पवार, अमित कुटे, जितेंद्र गायकवाड, भरत दथरे, प्रमोद गायकवाड आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिकात्मक पदवीचे दहनयुवकांमध्ये वाढलेली बेरोजगारी, पात्रता असूनही नोकरी मिळविण्यास येत असलेल्या आडचणीमुळे युवक त्रस्त आहेत. या विरोधात विद्यापीठात आयोजित ‘अभ्यास चालु ठेवा’ आंदोलनाच्या शेवटी पदवी प्रमाणपत्राचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. युवकांच्या समस्या सोडविण्यास आणखी दिरंगाई केल्यास लवकरच सामुहिक पदवी दहन करण्यात येईल, असा इशाराही उपस्थितांनी यावेळी दिला.