लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरवासीयांची गुरुवारी अवकाळी पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हर्सूल परिसर, टीव्ही सेंटर, मयूर पार्क, सिडको या भागात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. ऐन कामावरून घरी परत जाण्याच्या वेळी हा पाऊस झाल्याने अनेकांवर थंडीत भिजण्याची वेळ आली.
सायंकाळी सात वाजतादेखील शहराच्या पूर्व भागात सुमारे दहा मिनिटांपर्यंत पाऊस झाला. या पावसाने औरंगपुरा, जालना रोड, गारखेडा, मुकुंदवाडी, सातारा परिसरासह अर्ध्या शहराला भिजवले. विशेष म्हणजे शहराच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये ५ ते ६ अंश सेल्सिअने वाढ झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवर दुपारी आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने सायंकाळी पाऊस पडला, अशी माहिती हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून औरंगाबादकरांना हिवाळ्यातही पावसाळा असल्याप्रमाणे वाटत आहे. ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारपासून शहरात ढगाळ वातावरण आहे.
गुरुवारी सकाळी ऊन पडल्यानंतर दुपारनंतर पुन्हा ढगांचे आगमन झाले. ओखी वादळ जरी मुंबई किनारपट्टीपासून दूर गेले असले तरी त्याचा परिणाम अद्याप दिसत आहे.