लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रसूतीसाठी जालन्याहून आई-वडिलांकडे आलेली ३० वर्षीय विवाहिता एका महिन्याच्या तान्हुल्यासह तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजता उल्कानगरीत घडली.रोहिणी राहुल भंडारी, असे मृत्यू झालेल्या मातेचे नाव आहे. तान्हुल्याचे तर अद्याप नामकरणही झाले नव्हते. याविषयी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहिणीने आत्महत्या केली, की ती टेरेसवरून पडली याविषयी उलगडा झालेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.फौजदार बाळासाहेब आहेर यांनी सांगितले की, रोहिणीचा विवाह जालन्याच्या राहुल भंडारी यांच्यासोबत झाला होता. भंडारी यांचा कापडाचा व्यवसाय असून, गत दीड महिन्यापूर्वीच पहिल्या प्रसूतीनिमित्त रोहिणी माहेरी आली होती. उल्कानगरी परिसरातील मुथा कॉम्प्लेक्समध्ये (गायकवाड शाळेजवळ) आई-वडील चंद्रकांत तातेड राहतात. भाऊ अजय तातेड हा मुंबईत नोकरी करतो. तो नुकताच मुंबईहून औरंगाबादला आला होता.रोहिणीने महिनाभरापूर्वी एका मुलाला जन्म दिला होता. मंगळवारी सकाळी घरातील सर्व जण झोपेत असताना रोहिणी बाळाला घेऊन मुथा कॉम्प्लेक्सच्या तीन मजली इमारतीच्या छतावर गेली. बिल्डिंगवरून काही तरी पडल्याचा आवाज आल्याने आजूबाजूच्या लोकांनी बाहेर येऊन बघितले. त्यांनी रोहिणी व बाळाला बघून त्वरित तातेड यांच्या घराचा दरवाजा वाजविला.रोहिणी घरात न दिसल्याने काय झाले, असे विचारून तिचे आई-वडील घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आले. कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस गर्दी दिसली. तेथे जाऊन पाहिले असता मुलगी लहान बाळासह बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. हे दृश्य पाहून तातेड परिवाराने हंबरडा फोडला. शेजा-यांच्या मदतीने रोहिणी व लहान बाळाला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.
तान्हुल्यासह मातेचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:59 AM