बोरगाव अर्ज (औरंगाबाद) : तलावात बुडत असलेल्या पुतण्याला वाचविण्यासाठी चुलत्याने पाण्यात उडी घेतली. मात्र यात दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. घडली शेलगाव खुर्द परिसरात घडली. पंढरीनाथ कचरु काळे (वय ३४) व रितेश अजिनाथ काळे(वय १८, दोघेही रा. जळगाव मेटे) मृत्युमुखी पडलेल्या चुलत्या पुतण्याची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव मेटे येथील पंढरीनाथ काळे हे आपल्या शेलगाव खुर्द शिवारातील शेतात कपाशी फवारणी करीत होते. यावेळी त्यांचा इयत्ता अकरावीत शिकत असलेला पुतण्या रितेश हा जवळच्या तलावातून त्यांना पाणी आणून देत होता. मात्र अचानक रितेशचा पाय घसरुन तो तलावात पडला. तेथे असलेल्या रितेशच्या लहान भावाने आरडाओरड केली. हे पाहून पंढरीनाथ काळे यांनी पाठीवरील पंप खाली ठेवून रितेशला वाचविण्यासाठी तलावाकडे धाव घेत पाण्यात उडी घेतली. मात्र यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचाही मृतदेह पाण्याबाहेर काढून फुलंब्री येथील रुग्णालयात आणला. शवविच्छेदनानंतर दोघांवरही शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील दोघांच्या मृत्यूमुळे जळगाव मेटे गावावर मोठी शोककळा पसरली होती. पंढरीनाथ यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. तर रितेशच्या पश्चात आजी-आजोबा, आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास पोनि. आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण करीत आहेत.