सोयगाव : विद्युतपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पाय घसरून विहीरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (दि.३१) पहाटे घडली. रमेश नारायण महाजन ( ४४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मुखेड शिवारात गट नं.२१ मध्ये रमेश महाजन यांच्या नावे एक हेक्टर शेती आहे. सध्या शेतात मकाची लागवड केली आहे. रमेश महाजन गुरुवारी भल्या पहाटे मका पिकास पाणी देण्याकरीता शेतावर आले. विजपंप सुरु करत असताना पाय घसरल्याने ते विहीरीत कोसळले. विहीरीत जास्त प्रमाणात पाणी असल्याने व पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. काही वेळानंतर त्यांचा पुतण्या दिलीप महाजन शेतात आला. यावेळी त्याला रमेश महाजन विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्याने नातेवाईक आणि पोलिसांना याची माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला. याबाबत सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर गीते, जमादार सुभाष पवार, दिलीप तडवी, विकास दुबेले, श्रीकांत तळेगावकर करत आहेत. मुखेड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, दोन भाऊ व एक बहीण असा परीवार आहे.