पाचोड : मुरमा (ता. पैठण) शिवारातील पाण्याने भरलेल्या एका खदानीत कपडे धुताना पाय घसरून पडल्याने बुडून एका ४५ वर्षीय गरीब कुटुंबातील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. मीराबाई गणपत चिडे असे मयत महिलेचे नाव आहे.
मुरमा येथील गणपत चिडे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. परिस्थिती हलाखीची असल्याने ते पत्नी मीराबाईसह मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. गुरुवारी सकाळी मीराबाई चिडे या कपडे धुण्यासाठी शिवारातील खदानीवर गेल्या होत्या. कपडे धूत असताना शेवाळलेल्या खडकावरून पाय घसरून त्या पाण्याने भरलेल्या खोल खदानीत पडल्या. पाेहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. खूप वेळ झाला तरी मीराबाई न आल्याने कुटुंबियांसह नागरिकांनी शोध घेतला असता, एका खदानीच्या काठावर मीराबाई चिडे यांच्या चपला व कपडे मिळून आले. त्यानंतर ही माहिती तातडीने पाचोड पोलिसांना देण्यात आली. सपोनि. गणेश सुरवसे, पोलीस जमादार जगन्नाथ उबाळे, जीवन गुढेकर, किशोर शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील जिब्राईल पटेल, कृष्णा मंडलिक, इस्माईल पटेल यांनी खदानीत उड्या मारून मीराबाई यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेचा पाचोड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. गणेश सुरवसे करीत आहेत.
तीन दिवसांची बाळंतीण मुलगी वाट पाहत होती आईचीमीराबाई चिडे यांची मुलगी तीन दिवसांपूर्वीच बाळंतीण झाली होती. यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. गुरुवारी सकाळी खूप वेळ झाला तरी आई कपडे धुऊन आली नसल्याने सदर मुलगी आईची वाट पाहत होती. शेवटी तिने वडिलांना फोन करून माहिती दिली. त्यांच्यासह रमेश चिडे, उपसरपंच दिनकर मापारी आदींनी खदानीकडे शोध सुरू केला. तेव्हा काठावर कपडे व साहित्य मिळून आले. मीराबाई या पाण्यात बुडाल्याचे सर्वांच्या लक्षात आले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.