औरंगाबाद : हमदर्द लॅबोरेटरीज (इंडिया) या गु्रपला औरंगाबादेत कंपनी सुरू करण्यापूर्वीच कटू अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुभवाची तक्रार कंपनीचे शमशाद अली यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कंपनीने १५० कोटींची गुंतवणूक केली असून, पुढील टप्प्यातील ३५० कोटींची गुंतवणूक करायची की नाही याबाबत व्यवस्थापन गांभीर्याने विचार करू लागले आहे.
औरंगाबाद आणि नागपूर येथे ‘मेक इन महाराष्ट्र’अंतर्गत येथील शेंद्रा एमआयडीसीमध्ये दोन टप्प्यांत ५०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने कच्च्या मालासाठी पैठण आणि गंगापूर येथे घेतलेल्या जमिनीपैकी गंगापूर तालुक्यातील महुली येथे स्थानिकांनी त्रास देण्यास सुरुवात केली आहे.
महुली येथे शेतीसाठी दोन वर्षांपूर्वी जमीन घेतली. त्या जमिनीचा पूर्ण खरेदी-विक्री व्यवहार झाल्यानंतर मालकी वादातून प्रकरण कोर्टात पोहोचले. कोर्टाने ‘जैसे थे’चे आदेश दिला.कंपनीने त्या जमिनीवर सुरक्षा भिंत बांधलेली होती, सुरक्षारक्षक नेमले होते. दरम्यानच्या काळात स्थानिकांकडून सुरक्षारक्षकांना हुसकावण्यात आले, शिवाय तेथील सुरक्षा भिंतही पाडण्यात आली. याप्रकरणी कंपनीने स्थानिक पोलिसांत तक्रार केली; परंतु काही प्रतिसाद मिळाला नाही.
५०० हून अधिक रोजगारनिर्मितीकंपनी सुरू झाल्यानंतर ५०० जणांना थेट, तर १ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणे शक्य होईल; परंतु येथील कटू अनुभवामुळे ३५० कोटींची दुसऱ्या टप्प्यातील गुंतवणूक करण्याबाबत कंपनी विचार करू लागली आहे. पैठण आणि गंगापूर येथे शेतीसाठी घेतलेल्या जमिनीपैकी गंगापूर येथील जमिनीबाबत वाद सुरू झाल्यामुळे कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.