Union Home Minister Amit Shah : छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजपाकडूनअमित शाह यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, आज रात्री अमित शाह हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाल्यानंतर अमित शाह यांचे स्वागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे यांनी केले. यावेळी राज्यमंत्री अतुल सावेही उपस्थित होते.
आज रात्री अमित शाह छत्रपती छत्रपती संभाजीनगरमध्येच मुक्कामी असणार आहेत. उद्या सकाळी अमित शाह अकोला आणि जळगावमधल्या सभेला जाणार आहेत. उद्या सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून अकोला शहराकडे ते रवाना होतील. तेथून पुन्हा सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात येतील. सव्वासहा वाजता क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पूतळ्यास अभिवादन केल्यानंतर मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर एका सभेला उपस्थित राहणार आहेत. सभा संपल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास अमित शाह दिल्लीला रवाना होतील.
दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सभेसाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळं शहरातील वाहतुकीमध्ये उद्या दुपारपासून रात्री १२ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तसेच शहरात पोलिस आयुक्तांनी नो ड्रोन झोन प्रतिबंधक आदेशही लागू केले आहेत. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शाह यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार का? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.