औरंगाबाद:महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर मोदी सरकार करत असल्याचे आरोप विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत. मात्र, यातच केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे प्रमुख नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) भाजप व शिवसेना यांनी एकत्र यावे आणि सरकार स्थापन करावे, अशी इच्छा व्यक्त करताना दिसतात. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आरोपांवर बोलताना, केंद्रातील मोदी सरकार मुद्दाम कोणाला त्रास देणार नाही. संजय राऊत यांचे आरोप निरर्थक आहेत, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. ठाकरे सरकार प्रशासनाचे मॅनेजमेंट चांगले करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहे. सरकारकडून विकास कामांबाबत योग्य आढावा घेतला जात नाही, अशी टीका आठवले यांनी केली.
संजय राऊत यांचे आरोप निरर्थक आहेत
सरकार पाडण्याचा आमचा मानस नाही, त्यामुळे संजय राऊत यांचे आरोप निरर्थक आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर चुकीचा होत नाही, मोदी सरकारला अशा छोट्या चौकशी करण्याची गरज नाही. केंद्र विकास आराखडा घेऊन पुढे जात आहे.आमचे सरकार मुद्दाम कोणाला त्रास देणार नाही. राज्यात आताच्या घडीला सुरू असलेले भांडण मिटले पाहिजे, असे आम्हाला वाटते. उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा आणि संजय राऊत यांना समज द्यावी, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल
शिवसेना-भाजपा एकत्र आले पाहिजे. दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. जुन्या फार्मुल्यावर एक असल्यास भाजपा देखील तयार होईल, असे सांगताना ठोस पुरावे नसताना आरोप करू नये. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरावर कारवाई करणारे अधिकारी इतके वर्ष झोपले होते का? सुडाची भूमिका असू नये. कंगना यांचे कार्यालय देखील तोडण्यात आले होते, असे रामदास आठवले म्हणाले.