औरंगाबाद : शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शरीररचनेचा समावेश असतो; परंतु अनेकदा हा अभ्यास केवळ पुस्तकापुरताच मर्यादित राहतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे मानवी अवयवांचे अनोखे म्युझियम साकारण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना मेंदू, हृदय, किडनी ,फुफ्फुस यांसह शरीरातील विविध अवयव प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळत आहे.घाटी रुग्णालयातील शरीररचनाशास्त्र विभागात हे अनोखे म्युझियम साकारण्यात आले आहे. मानवी मेंदू, हृदय, किडनी, फुफ्फुस प्रत्यक्षात कसे दिसतात, असा प्रश्न अनेकदा विद्यार्थ्यांना पडतो. केवळ पुस्तकातील चित्ररूप पाहून त्याची रचना समजून घेण्याची वेळ येते. अनेकदा त्यातून विद्यार्थ्यांना मनातील प्रश्नांची उत्तरे मिळत नाही. मात्र मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे या म्युझियममध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळतात. शरीरातील मेंदूपासून तर पायापर्यंतचे विविध अवयव या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहता येत आहेत. या ठिकाणी शरीरातील अवयवांचे केवळ दर्शनच होत नाही, तर येथील तज्ज्ञ विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करून मार्गदर्शन करतात.विविध अवयवांचे कार्य कसे चालते, त्यांची रचना कशी आहे, हे समजून सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. शैक्षणिक आणि भावी आयुष्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरत आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवारी हे म्युझियम पाहता येणार आहे. त्यासाठी पूर्वकल्पना द्यावी लागेल. तसेच विद्यार्थ्यांसोबत शिक्षक असणे आवश्यक राहणार आहे.
मानवी अवयवांचे अनोखे म्युझियम
By admin | Published: October 12, 2016 12:52 AM