राजकुमार जोंधळे ल्ल लातूरगेल्या ६ महिन्यांपासून दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या संकटात सापडलेल्या लातूरकरांना मदत करण्यासाठी गुजरातहून धाऊन आलेल्या मराठी माणसाने मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दिवसाकाठी तब्बल ५० हजार लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा शुक्रवारपासून सुरू केला आहे. या अनोख्या उपक्रमाचे निर्माते महाराष्ट्रातील धुळे येथील वैज्ञानिक संजय देवराम पाटील हे आहेत. गुजरातमधील भावनगर येथे केंद्रीय मीठ आणि समुद्री रसायन अणुसंसाधन केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. मराठी माणूसपण जपणाऱ्या या वैज्ञानिकाला लातूरच्या दुष्काळावर काही तरी उपाय शोधावा, हा विचार गेली काही महिन्यांपासून अस्वस्थ करीत होता. आपल्या कल्पकतेतून जलशुद्धीकरण व्हॅनची निर्मिती त्यांनी केली. या व्हॅनच्या माध्यमातून दिवसाकाठी ५० हजार लिटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. आपल्या सात जणांच्या टीमसह ते शुक्रवारपासून लातुरात गोरक्षण परिसरात दाखल झाले आहेत. क्षारयुक्त पाण्यावर प्रक्रिया करून लातूरकरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. हे काम आणखी आठवडाभर सुरू राहणार आहे. लातुरातील दुष्काळाची दाहकता माध्यमातून पाहता आली. त्यामुळे लातूरकरांना या दुष्काळात मदत करण्याच्या हेतूने आम्ही भावनगर येथून लातुरात आलो असल्याची भावना वैज्ञानिक संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. या उपक्रमाला केंद्र शासनाच्या अणुसंसाधन केंद्राचे पाठबळ आहे.
दुष्काळात लातूरकरांसाठी अनोखा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2016 12:06 AM