रऊफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कफुलंब्री : केंद्र सरकारने माणसाची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड काढले, त्याच धर्तीवर जनावरांची ओळख पटण्यासाठी पशू संजीवनी योजना सुरु करून जनावरांना बारा अंकी युनिक आयडी कोड देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दुधाळ जनावरांना यासाठीचा ‘बिल्ला’ मारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.केंद्र सरकार पुरस्कृत पशू संजीवनी योजना सुरु करण्यात आली असून यात मनुष्याप्रमाणे जनावरांची ओळख पटावी, त्यांच्या संख्येची माहिती मिळावी तसेच त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवता यावी, यासाठी प्रत्येक जनावरांची ओळख करून त्यांना टॅग लावण्याचे काम पशुसंवर्धन विभागाच्या वतीने या महिन्यापासून सुरु करण्यात आले आहे.पहिल्या टप्यात दुधाळ गायी, म्हशींना टॅग लावण्यात येत आहे. महिनाभरात सुमारे दहा हजार दुधाळ जनावरांना हे टॅग लावण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त प्रशांत चौधरी यांनी सांगितले.सलग दोन वर्षे हे काम सुरु राहणार असून हे काम तीन टप्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चालू वर्षामध्ये सर्व दुधाळ जनावरांना युनिक आयडी कोड देण्यात येणार आहे तर दुसºया टप्यात म्हणजे पुढील वर्षी पाळीव जनावरांना हा आयडी कोड देण्यात येणार असून जिल्ह्यातील पशु चिकित्सक या कामाला लागले आहेत.ईनाफ प्रणाली उपलब्धप्रत्येक जनावरांची सर्व प्रकारची माहिती आता आॅनलाईन मिळणार असून यासाठी ईनाफ संगणक प्रणाली पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध झाली आहे.जनावर कोणते, त्याचा रंग कोणता, त्याचे वय किती, शारीरिक स्थिती कशी, त्याला आजार आहे का, किती दुध देतात, अशी माहिती टॅग लावल्यानंतर आॅनलाइन शासनाला पाठवली जात आहे.पहिल्या टप्प्यात पशूसंवर्धन विभागाला जिल्ह्यासाठी ५४ हजार ४०० टॅग मिळाले असून त्यापैकी दहा हजार दुधाळ जनावरांना टॅग लावण्यात आले आहेत. त्या टॅगवर एक सांकेतिक क्रमांक आहे. जनावरांची संपूर्ण माहिती हवी असेल तर तो सांकेतिक क्रमांक पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवर टाकल्यास पूर्ण माहिती मिळू शकेल.
आधार कार्डच्या धर्तीवर गुरांनाही युनिक आयडी कोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:25 AM