औैरंगाबाद : गरिबांचा निराला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रविवारच्या आठवडी बाजारात शेकडो हमाल खास शर्ट-पँट खरेदी करण्यासाठी येत असतात. अनेक हमाल असे आहेत की, दर आठ दिवसांनी ते नवीन कपडे खरेदी करतात.
जाफरगेट परिसरात भरणाऱ्या रविवारच्या बाजारात भाजीपासून ते टीव्हीपर्यंत सर्व काही विक्री होते. येथील सेकंडहँड इलेक्ट्रॉनिक्स बाजार मराठवाडा व खान्देशात प्रसिद्ध आहे. तसाच येथील रेडिमेड कपडे बाजारही प्रसिद्ध आहे. दिवसभरात लाखाची उलाढाल येथील कपडे बाजारात होत असते. कारण अवघ्या ३० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत येथे रेडिमेड कपडे विकले जातात. खास करून हमाल वर्ग, गॅरेजमध्ये काम करणारे दर रविवारी येथे कपडे खरेदीसाठी येत असतात. ३० ते ५० रुपयांदरम्यानचे शॅर्ट, पँटची हातगाडीवर मोठ्या प्रमाणात येथे विक्री होते. ‘लो भाई, लो कपडे लो’, ‘ आज सस्ता, कल महेंगा’, ‘रस्ते का माल सस्ते मे’ असे ओरडत हातगाडीवाले ग्राहकांना आकर्षित करीत असतात.
कपडे खरेदी करणाऱ्यांमध्ये माथाडी कामगार, हमालांचा समावेश असतो. उत्तम जोगदंड यांनी सांगितले की, मी मोंढ्यात हमालीचे काम करतो. गाडीतून पोते काढून दुकानात व दुकानातून लोडिंग रिक्षात ठेवावे लागते. पोते पाठीवर ठेवावे लागते, यामुळे कपडे लवकर खराब होतात, पाठीवर फाटतात. फाटके कपडे घालून काम करणेही चांगले वाटत नाही. यासाठी दर रविवारी किंवा महिन्यातून दोनदा रविवारच्या आठवडी बाजारात आम्ही कपडे खरेदीसाठी येतो. अवघ्या ३० ते ५० रुपयांत शर्ट, पँट मिळते. १०० रुपयांत शर्ट, पँट विकत मिळते. हाच शर्ट, पँट आम्ही दुकानात काम करताना घालतो. फाटले तरी काही फरक पडत नाही.
शेख रज्जाक यांनी सांगितले की, घरून येताना आम्ही चांगले कपडे घालून येतो व दुकानात आल्यावर रविवारच्या बाजारात खरेदी केलेले कपडे घालत असतो. स्वस्त असल्याने ते फाटले तरीही परत नवीन घेता येतात. अनेकदा व्यापारीही कपडे खरेदी करून हमालांना देतात. अनंतराव वाघमारे हे दुकानदारही रेडिमेड कपडे खरेदीसाठी आले होते. ते म्हणाले की, आमच्या दुकानात चार हमाल आहेत. त्यांच्यासाठी महिन्यातून एकदा ८ ते १० कपडे येथून घेऊन जातो. अनेक गरीब लोक येथून कपडे घेऊन जातात.
कंपन्यांचे रिजेक्ट कपडे आठवडी बाजारातकपडे विक्रेता रज्जाकभाई यांनी सांगितले की, आम्ही मुंबईहून लॉटमध्ये कपडे मागवितो. कंपन्यांच्या रिजेक्ट कपड्यांना इस्त्री करून ते विकले जातात. हजारो शर्ट, पँट एकाच वेळी खरेदी केल्याने ते आम्हाला स्वस्तात मिळतात. गरीब लोक, हमाल हे कपडे खरेदी करतात. रविवारी एका हातगाडीवरून ३०० पेक्षा अधिक कपडे विक्री होतात. अशा ५० ते ६० हातगाड्यांद्वारे कपडे विकले जातात. याशिवाय बनियन, अंडरपँटचीही मोठ्या प्रमाणात विक्री होते.