नजीर शेख , औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये तीन वर्षांपूर्वी ‘पेट’ उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळाले नाहीत. विविध कारणे सांगून जागा रिक्त ठेवणारे मार्गदर्शक प्राध्यापक खरे तर विद्यार्थ्यांसाठी संशोधनाची दारे बंद करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विद्यापीठात पीएच. डी. च्या मार्गदर्शकप्राध्यापकांकडे सुमारे साडेचारशे जागा रिक्त आहेत. अनेक प्राध्यापकांकडे जागा रिक्त राहिल्या तरी विद्यापीठाने कोणताच हस्तक्षेप केलेला नाही. दुसरीकडे नव्यानेच ‘गाईड’ झालेल्या काही प्राध्यापकांकडे विद्यापीठाने विद्यार्थी पाठविलेच नाहीत. विद्यापीठात आणि महाविद्यालयांत काही असेही महाभाग आहेत की, काम वाढते म्हणून विद्यार्थी संख्या वाढवत नाहीत. संशोधनासाठी आठ विद्यार्थी घेण्याचा नियम असताना काही जण चार किंवा पाचच विद्यार्थी घेतात. नियम विद्यापीठ अनुदान आयोेगाने तयार केला आहे. विद्यापीठाने किंवा महाविद्यालयाने नाही. मराठवाड्यातील महाविद्यालयांत आणि विद्यापीठात शिकण्यासाठी येणारे नव्वद टक्के विद्यार्थी- विद्यार्थिनी हे ग्रामीण पार्श्वभूमी असलेले आणि शोषित वर्गातील असतात. विद्यापीठातील अनेक प्राध्यापकही याच प्रकारे विद्यापीठात शिक्षण घेऊन प्राध्यापक आणि पुढे संशोधक झाले. सध्याचे विद्यार्थीही त्यांना पाहूनच आपला शिकण्याचा आणि संशोधनासाठीचा संघर्ष चालू ठेवत आहेत. शिक्षणासाठी संघर्ष करू, प्रसंगी उपाशी राहू; परंतु शिक्षण सोडणार नाही, असा दृढ निर्धार करून अनेक विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत पोहोचले. एकेकाळी शिक्षण हे विशिष्ट घटकांपर्यंत सीमित होते. त्याची कवाडे खुली करण्याचे काम अनेक समाजसुधारकांनी केले. मुले पदव्युत्तर होऊ लागली. त्यांना संशोधनातील कळू लागले. पीएच. डी. करण्याची ऊर्मी ते बाळगू लागले. त्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता (पेट) त्यांनी धारणही केली. मात्र, तरीही अशा विद्यार्थी-विद्यार्थिनींना ‘गाईड’ मिळू शकले नाहीत, हे म्हणजे या विद्यार्थ्यांना संशोधनाची दारे बंद करण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. ज्यांनी जागा रिक्त असतानाही संशोधनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवले ते लोक खरे म्हणजे विद्यार्थ्यांचे गुन्हेगारच. विद्यापीठात संशोधनाची केवळ चर्चा असल्याचे दिसते. ठराविक प्राध्यापक गांभीर्याने त्याबाबत कृती करताना दिसतात. महाविद्यालयांत तर संशोधनाची परिस्थिती अत्यंत विदारक. संशोधनाअभावी अनेक विद्यार्थी वंचित राहत आहेत. त्यांची शिक्षणाची दोन दोन वर्षे वाया जात आहेत, याची ना कुणाला खंत, ना चिंता. कौटुंबिक कारणांमुळे किंवा प्रकृतीच्या कारणांमुळे एखाद्या प्राध्यापकाने पीएच. डी. संशोधनासाठी विद्यार्थी न घेतल्यास समजू शकते. मात्र, काम वाढते म्हणून विद्यार्थी संख्या वाढवायची नाही, हा प्रकार शिक्षणाप्रती अनास्था दर्शविणारा आहे. संशोधक मार्गदर्शक व्हावे यासाठी धडपडणाऱ्या प्राध्यापकांना ‘गाईड’ झाल्यानंतर विद्यार्थ्यांप्रती आस्था राहत नाही की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मागच्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप थांबविली होती. आताचे कुलगुरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शक देऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांप्रती सर्वत्र अनास्था. पुरस्कार घेण्यासाठी आणि परदेश दौऱ्यासाठी अनेक वेळा दिल्ली गाठणाऱ्या कुलगुरूंनी तेवढा वेळ विद्यार्थ्यांना ‘गाईड’ मिळवून देण्यासाठी खर्ची घातला असता आणि या कृतीमुळे विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला असता तर तोच त्यांच्यासाठी महत्त्वाचा पुरस्कार ठरला असता.
संशोधनाची दारेच बंद करण्याचा अजब प्रकार
By admin | Published: September 21, 2016 12:06 AM