औरंगाबाद : ‘रंगात वाटलेल्या निर्बुद्ध माणसांनो, आताच एक व्हा रे तडकेल लोकशाही, पारायणे करा ग्रंथासम घटना, मेंदूत उतरेल मग जराशी लोकशाही’ अमरावती येथून आलेल्या नितीन देशमुख यांच्या या टोकदार कवितेने सर्वांना आत्मचिंतनास भाग पाडले.
संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात कवी सुधाकर भुईगळ स्मृतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलन रंगले. प्रा. दिलीप महालिंगे यांनी प्रेमकवितेपेक्षा सामाजिक कवितेचे कालानुरूप महत्त्व विशद केले. सुमित भुईगळ यांनी प्रास्ताविक, चेतन चोपडे यांनी सूत्रसंचालन केले. अमित भुईगळ यांनी आभार मानले.
‘चुडा जसा हातामंदी, तसा जीव गुंतला, चुडा कसा का असेना, जीवापाड जप त्याला,’ या अविनाश भारतीच्या कवितेला सभागृहाने डोक्यावर घेतले. भरत दौंडकर यांनी ‘गोफ’, ‘अंदाज येत नाही’ या कवितांतून सामाजिक तेढ, सध्याचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या स्थितीवर उजेड टाकला.अरुण पवार यांनी ‘अफू’ कवितेतून शेतमाल हमी भावावर बोट ठेवत खेड्याकडे चला याला अर्थ काय बापू, असा सवाल केला.सुनील उबाळे यांनी ‘गरिबीचे चटके’ कवितेतून विशद केले. रवी केसरकर यांनी माणसांना जो सदा फेटाळतो, धर्म तो सांभाळणे नाही बरे, अशा ओळींतून शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वेगळा विचार मांडला. नारायण पुरी यांच्या ‘भीम मोत्याचा हार, भीम नंगी तलवार ग माय’ या कवितेसह जांगडगुत्ता, काटा या कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.