लातूर : दलित, ओबीसी, आदिवासी, भटके विमुक्त, मुस्लिम स्वाभिमान संघर्ष महा मूकमोर्चात बौद्ध, मातंग, ढोर, चांभार, धनगर, माळी, साळी, कोळी, वंजारी, यलम, वडार, मुस्लिम, आदिवासी, गवंडी, लोहार, सोनार, सुतार, भावसार, कासार, कोल्हाटी, गोंधळी, तेली, तांबोळी, न्हावी, पारधी, परीट, मसणजोगी, घिसाडी, महादेव कोळी, वासुदेव, जंगम, कुंभार, गोसावी, जोशी, बागवान, कतारी, छप्परबन, फकीर, मणियार, कोष्टी, नामदेव शिंपी, लिंगायत, मारवाडी, गुजराती, ब्राह्मण, राजपूत आदी समाज बांधवांच्या एकतेचे विराट दर्शन लातूरकरांना मंगळवारी घडले.एकतेची वज्रमूठ आता आम्ही सोडणार नाही, असा एल्गार या समाज बांधवांचा दिसून आला. महा मूकमोर्चात लक्षणीय सहभाग होता तो महिला भगिनींचा. पारंपरिक वेशभूषेत भटक्या विमुक्त समाजातील गोंधळी, वासुदेव, धनगर आदी समाज बांधव सहभागी झाले होते. निळ्या ध्वजाबरोबर पिवळा, हिरवा, भगवा आणि पंचशील ध्वज दिमाखाने या महा मूकमोर्चात फडकत होते. तरुण-तरुणींच्या हातातील हे ध्वज एकतेचेच दर्शन घडवीत होते. प्रारंभी क्रीडा संकुलावर एकत्र येताना वेगवेगळ्या समूहांचे जथेच्या जथे सकाळी ८ वाजेपासूनच ‘जय भीम’चा नारा देत एकत्र आले. दुपारी १.३० वाजेपर्यंत क्रीडा संकुल बहुजनांच्या या समूहाने खचाखच भरले होते.
एकतेची वज्रमूठ !
By admin | Published: November 16, 2016 12:21 AM